पंजाब, हरियाणासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातील संकरित बासमती भाताच्या काढणीला वेग आला आहे. हा नवा बासमती बाजारात दाखल होत असून, या संकरित बासमतीच्या दरात किरकोळ तेजी दिसून येत आहे, ही तेजी पुढील वर्षभर कायम राहील, अशी शक्यता व्यापारी व्यक्त करीत आहे. दर्जेदार बासमतीच्या खरेदीसाठी व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत.
हेही वाचा- मुंबई, ठाण्यातील गोवर उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नागरिकांना खबरदारीचे आवाहन
यंदा मोसमी पाऊस उशिराने सक्रिय झाल्याचा परिणाम म्हणून भात उत्पादक राज्य म्हणून ओळख असलेल्या पश्चिम बंगालमध्ये उत्पादनात मोठी तूट येण्याची शक्यता आहे. त्याशिवाय मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणामधील भात उत्पादनात कमी प्रमाणात का होईना तूट येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनेही यंदा भात उत्पादनात सरासरी पाच ते सहा टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने व्यक्त केला आहे.
पंजाब, हरियाणासह मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये १४०१ आणि १५०९ या संकरित बासमती तांदळाची लागवड जूनमध्येच केली जाते. पावसाच्या पाण्यावर अवलंबून नसलेल्या सिंचनाची सोय असलेल्या ठिकाणी या संकरित बासमती वाणाची लागवड होते. हे वाण कमी पाण्यात, कमी दिवसांत म्हणजे ११० ते ११५ दिवसांत काढणीसाठी येते. सध्या याच संकरित बासमती भाताची काढणी वेगाने सुरू असून, याचा तयार झालेला नवा तांदूळही बाजारात दाखल होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत प्रति क्विंटल १०० ते १५० रुपयांची तेजी दरात दिसून येत आहे. बासमती निर्यातक्षम तांदूळ असल्यामुळे देशात आणि परदेशात चांगली मागणी असते.
हेही वाचा- किल्ले सिंहगड परिसर अतिक्रमण वेढ्यातून मुक्त; वनविभागाची कारवाई
व्यापाऱ्यांची लगबग सुरू
तांदळाचे मोठे व्यापारी भाताची काढणी सुरू होताच कोणत्या राज्यातील भात दर्जेदार आहे, याचा अंदाज घेण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जातात. निर्यातक्षम दर्जाचा भात उत्पादित होत असल्याचा अंदाज येताच संबंधित परिरातील बाजार समितीतून भाताची खरेदी करतात. हा भात गिरण्यांमध्ये साठवतात आणि मागणीनुसार प्रक्रिया करून तांदूळ बाजारात आणतात. गरजेइतका आणि दर्जेदार भात मिळावा, यासाठी व्यापाऱ्यांची ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यांत लगबग वाढते.
हेही वाचा- पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आता मंजूर प्रकल्पांनाच अनुदान
नव्या हंगामातील ‘१४०१’ आणि ‘१५०९’ या संकरित वाणाच्या बासमती तांदळाची बाजारात आवक सुरू झाली आहे. यंदा दरात किरकोळ तेजी आहे. पण, ही तेजी वर्षभर टिकून राहील. ‘११२१’ या संकरित वाणाच्या बासमती वाणाच्या तांदळाला सर्वाधिक मागणी आहे. या वाणाच्या तांदळाची आवक नोव्हेंबरअखेरपासून सुरू होईल. ११२१ ला मागणी आणि दर चांगला असल्याने यात १४०१ आणि १५०९ संकरित वाणाच्या तांदळाची भेसळ होते, असे मत तांदळाचे व्यापारी राजेश शहा यांनी व्यक्त केले.