दुचाकी खरेदीत यंदा २० टक्क्य़ांनी वाढ; चारचाकी वाहनांची खरेदी स्थिर
दसऱ्याच्या मुहूर्तावर नवे वाहन घरी आणण्यासाठी सध्या शहरातील वाहन विक्रीच्या दालनांमध्ये वाहनांचे ‘बुकिंग’ जोमात सुरू असून, विशेषत: दुचाकीच्या खरेदीमध्ये मागील वर्षांच्या तुलनेत २० टक्क्य़ांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले. तीस लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या पुण्यात माणशी एक खासगी वाहन असताना दुचाकी खरेदीचा वाढलेला वेग लक्षात घेता दसऱ्यानंतर शहरातील रस्त्यांवर हजारोंच्या संख्येने नव्या दुचाकींची भर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. चारचाकी वाहनांची खरेदीही जोमाने सुरू असली, तरी ती मागील वर्षांइतकीच असल्याचे सांगण्यात आले.
कमकुवत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता प्रत्येकालाच शहरांतर्गत प्रवासासाठी स्वत:च्या वाहनाची आवश्यकता वाटते आहे. सद्य:स्थितीत प्रत्येक महिन्याला एक हजारांहून अधिक नव्या दुचाकींची शहरात भर पडते आहे. शहराच्या रस्त्यांवरील दुचाकी वाहनांची संख्या २७ लाखांच्याही पुढे गेली आहे. आता दसरा ते दिवाळीच्या दिवसांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाहन खरेदीची चिन्हे दिसत आहेत. कमीत कमी हप्ता, झटपट कर्जाची सोय आदींच्या माध्यमातून वाहन विक्रेते ग्राहकांना आकर्षित करत आहेत.
दसऱ्याच्या मुहूर्तासाठी वाहनांच्या बुकिंगबाबत शहरातील काही दालनांतून माहिती घेतली असता, यंदा दुचाकीची विक्री झपाटय़ाने वाढले असल्याचे सांगण्यात आले. छोटय़ा चारचाकी मोटारींनाही चांगली मागणी आहे. दुचाकींच्या खरेदीचे प्रमाण लक्षात घेता या वर्षांअखेर प्रतिमाणशी एक दुचाकी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
खरेदी करण्यात येत असलेल्या दुचाकींमध्ये नव्या रचनेतील स्कूटर या प्रकाराला मोठय़ा प्रमाणावर मागणी आहे. त्याचप्रमाणे तरुणांकडून प्रामुख्याने इंजिनची क्षमता अधिक असलेल्या तसेच बुलेट प्रकारातील दुचाकींची मागणी होत आहे.
दुचाकीच्या मागणीबाबत पाषाणकर होंडा दालनाचे विशाल गोसावी म्हणाले, की मागच्या वर्षीपेक्षा यंदा दुचाकींच्या विक्रीत वाढ आहे. मागणीबरोबरच खरेदीसाठी चौकशीही मोठय़ा प्रमाणावर करण्यात येत आहे. त्यामुळे दसरा ते दिवाळीपर्यंतही चांगल्या विक्रीची अपेक्षा आहे. मोटारींच्या विक्रीबाबत कोठारी हुंदाईचे गणेश तिडके म्हणाले, की दसरा व दिवळी हे दोन्ही मुहूर्त एकाच महिन्यात आले आहेत. त्यामुळे केवळ हाच महिना व्यवसाय होणार आहे. मोटारींच्या खरेदीत मागील वर्षांच्या तुलनेत वाढ नसली, तरी मागणी चांगली आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना दोन हजारांची सूट!
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वाहन कंपन्यांकडून वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या जातात. त्यानुसार यंदा दुचाकी निर्मितीच्या एका कंपनीने सरकारी कर्मचाऱ्यांना दुचाकी खरेदीवर दोन हजार रुपयांची सूट जाहीर केली आहे. वाहन खरेदीच्या कर्जाच्या परतफेडीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांकडून सर्वाधिक कमी अडचण निर्माण होत असल्याने त्यांना आकर्षित करणे, हाही या मागचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. नव्या रचनेतील स्कूटर प्रकारातील वाहन खरेदीवर एका कंपनीने हेल्मेट मोफत देण्याची योजना सुरू केली आहे.
पावलस मुगुटमल