कुटुंबातील मंडळींना तलवारीचा धाक दाखवित तेरा दिवसांच्या बालकास जिवे मारण्याची धमकी देऊन खंडणी उकळणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खडक पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे एका खुनाच्या गुन्ह्य़ामध्ये कारागृहात असताना वैद्यकीय कारणावरून जामीन मिळवून त्याने पुन्हा गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. न्यायालयाने त्याला १६ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
मुज्जमिल ऊर्फ मुर्गा शब्बीर मोकाशी (वय ३२, रा. घोरपडे पेठ) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. आरती महादेव मिसाळ (वय २५, रा. लोहियानगर, घोरपडे पेठ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. १६ जुलै रोजी घडलेल्या या घटनेनंतर मोकाशी फरार झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोकाशी हा तलवार घेऊन मिसाळ यांच्या घरी गेला. मिसाळ यांच्या तेरा दिवसांच्या बालकास जिवे मारण्याची धमकी देत त्याने पाच हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर त्याने मिसाळ यांच्याकडून जबरदस्तीने तीन हजार रुपये घेतले. याबाबत खडक पोलिसांकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर मोकाशी फरार झाला होता.
फरार मोकाशी सहकारनगर येथे त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव यांना खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या पथकाने त्याला शनिवारी सापळा रचून पकडले. मोकाशी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, दंगा, मारामारी, शस्त्र बाळगणे, गंभीर दुखापत करणे आदी गुन्हे दाखल आहेत. फेब्रुवारी २०१३ मधील एका खुनाच्या गुन्ह्य़ात मोकाशी कारागृहात होता. वैद्यकीय कारणासाठी न्यायालयाने त्याला जामीन दिला होता. मात्र, कारागृहाबाहेर आल्यानंतरही त्याने पुन्हा गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.