पिंपरी : बोपखेल व खडकीला जोडणाऱ्या मुळा नदीवरील पुलाचे काम ९८ टक्के पूर्ण झाले आहे. ऑगस्ट २०२४ अखेरीस पुल वाहतुकीस खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे सन २०१५ पासून १६ किलोमीटरचा वळसा मारून पिंपरीत यावे लागत असलेल्या बोपखेलवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. वाहतूक अंतर व वेळ कमी होणार आहे.

बोपखेल गावासाठी दापोडी येथील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरींग (सीएमई) हद्दीतून जाणारा नागरी रस्ता मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १३ मे २०१५ रोजी बंद करण्यात आला होता. त्यामुळे बोपखेल गावातील रहिवाशांना दापोडीकडे जाण्याकरीता पूर्वी लागणारे दोन किलोमीटरचे अंतर रस्ता बंद झाल्यामुळे सुमारे १६ किलोमीटर झाले. त्यामुळे बोपखेल येथील नागरीकांना पिंपरी-चिंचवड शहरात ये-जा करण्यासाठी भोसरी किंवा विश्रांतवाडी, खडकी मार्गावरुन सुमारे १५ ते १६ किलोमीटर अंतराचा वळसा घालावा लागत होता. त्यामुळे नागरिकांसह, विद्यार्थी व कामगारांची मोठी गैरसोय होत होती.

हेही वाचा…फर्ग्युसन रस्त्यावरील बार प्रकरण : पुण्यातील तस्कराकडून पार्टीत मेफेड्रोनचा पुरवठा

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बोपखेल ते खडकी असा मुळा नदीवर १८५६ मीटर म्हणजे सुमारे दोन किलोमीटर अंतराचा पुल बांधण्याचे काम महापालिकेने २० जुलै २०१९ रोजी हाती घेतले. पूल व जोडरस्त्याचे काम टी ॲण्ड टी इन्फ्रा कंपनी करीत आहे. न्यायालयीन प्रक्रिया, संरक्षण विभागाकडून जागा ताब्यात येण्यास विलंब आदी कारणांमुळे या पुलाचे काम रखडले होते. त्यामुळे कामाला चोवीस महिने मुदतवाढ दिली होती. पुलाची लांबी १८५६ मीटर तर रुंदी ८.४० मीटर आहे. पोहच रस्त्यांची लांबी बोपखेलच्या बाजुने ५८ मीटर आहे. तर, खडकीच्या बाजूने २६२ मीटर असे बांधकाम करण्यात आले आहे. आजअखेर पुलाचे काम ९८ टक्के पूर्ण झाले असून ऑगस्ट २०२४ अखेरीस पुल वाहतुकीस खुला करण्याचे नियोजन आहे.

या पुलाच्या जागेमध्ये संरक्षण विभागाच्या आस्थापना व वसाहतीसाठी विद्युत पुरवठा करणाऱ्या येत असलेल्या महापारेषण विभागाच्या अति उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या व मनोऱ्यामुळे कामास अडथळा निर्माण झाला होता. सद्यस्थितीत उच्च दाब विद्युत वाहिन्या व मनोरे १८ मे २०२४ रोजी स्थलांतरीत करण्यात आले आहेत. अनुषंगिक स्थापत्य विषयक कामे पूर्णत्वाकडे आहेत. या प्रकल्पामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना २.९ किलोमीटर अंतरावरावरून खडकी कटक मंडळ भागातून पिंपरी-चिंचवड व पुणे शहराकडे ये-जा करण्यास सुलभ होणार आहे. परिणामी, नागरिकांचा वेळ व इंधन खर्च वाचणार आहे.

हेही वाचा…शिक्षक भरतीमध्ये मोठी अपडेट… ३ हजार १५० उमेदवारांची झाली शिफारस!

याबाबत प्रकल्प विभागाचे सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे म्हणाले की, पुलाचे काम पूर्णत्वाकडे आहे. लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. संरक्षण खात्याशी व वाहतूक पोलिस अधिकारी यांच्याशी समन्वय साधून नियोजन करण्यात येत आहे. बोपखेल येथील नागरिक व कामगारांची सोय होणार तसेच विद्यार्थ्यांच्या वेळेमध्ये बचत होणार आहे.

हेही वाचा…पिंपरी : अलंकापुरीत वैष्णव दाखल! इंद्रायणीकाठी स्नानासाठी गर्दी, वडिवळे आणि आंद्रा धरणातून पाणी सोडून इंद्रायणी नदी स्वच्छ

माजी स्थानिक नगरसेविका, माजी उपमहापौर हिराबाई घुले म्हणाल्या की, बोपखेलवासीयांना नऊ वर्षांपासून १६ किलोमीटरचा वळसा मारावा लागत होता. पूल उभारण्यासाठी अनेक पातळ्यांवर संघर्ष करावा लागला. अखेरीस काम पूर्णत्वाकडे आले असून लवकरच पूल वाहतुकीसाठी खुला होईल. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.