लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : मध्य रेल्वे पुणे विभागातील रेल्वेच्या डब्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी नव्याने ‘कोचिंग डेपो’ सुरू करण्यात येणार आहे. आळंदी येथील स्थानकावर हा डेपो उभारण्यात येणार असून, त्यासाठी सुमारे ९० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. विशेष म्हणजे ‘वंदे भारत एक्स्प्रेस’च्या डब्यांची निर्मिती आणि दुरुस्ती या ठिकाणी होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
पुणे रेल्वे स्थानकात जागेची कमतरता पडत असल्याने विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांचे नियोजन करता यावे, म्हणून मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. त्यामुळे या ठिकाणी डब्यांच्या दुरुस्त देखभाल करणाऱ्या ‘कोचिंग डेपो’चे नियोजन होऊ शकत नसल्याने आळंदीची निवड केली आहे. त्यानुसार आळंदी स्थानक परिसरातील १० एकर जागेवर हा डेपो निश्चित करण्यात आला असून, पुणे रेल्वे विभागाकडून रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
दररोज तीनशेहून अधिक डब्यांची दुरुस्ती
सद्यस्थितीला पुणे स्थानकाजवळील घोरपडी कोचिंग मेंटेनन्स कॉप्लेक्स (जेसीएमसी) या ठिकाणी डब्यांची देखभाल दुरुस्ती करण्यात येते. दररोज ३०० पेक्षा अधिक डब्यांची दुरुस्ती केली जात आहे. या ठिकाणीही वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्यांची दुरुस्ती कऱण्यासाठी नव्याने डेपो तयार करण्यात येत आहे. रेल्वे डब्यांच्या दुरुस्तीची संख्या वाढल्याने याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.
स्वतंत्र लाइन सुरू करणार
आळंदी येथे साकारण्यात येणाऱ्या ‘कोचिंग डेपो’साठी स्वतंत्र रेल्वे लाइन तयार करावी लागणार आहे. त्यासाठी ६०० मीटर लांबीच्या ‘पीट लाइन’ आणि दोन ‘स्टेबलिंग लाइन’सुरू करण्यात येणार आहे. तसेच, एखादा डबा नादुरुस्त असला किंवा अचानक बिघाड झाला, तर त्याच्या दुरुस्तीसाठी ‘सिक लाइन’ची व्यवस्था करण्यात येणार आहे.
पुणे रेल्वे स्थानकातील गाड्यांचे नियोजन सुरळीत करून प्रवाशांना डब्यांमध्ये देण्यात येणाऱ्या सुविधांचा सहज लाभ घेता यावा, म्हणून स्वतंत्र ‘कोचिंग डेपो’ सुरू करण्याबाबत नियोजन होते. त्यानुसार आळंदी येथील जागेबाबत रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. -हेमंतकुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग