महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाने ५९१५ घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. त्यानुसार आतापर्यंत तब्बल ५९ हजार ७४६ जणांनी घरांसाठी अर्ज केले आहेत. मात्र, नव्या संगणकप्रणालीनुसार यंदाची सोडत निघणार असल्याने केवळ १८७१ नागरिकांच्या अर्जांची प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित अर्ज प्रक्रियेत आहेत. त्यामुळे नव्या संगणकप्रणालीचा फटका म्हाडाच्या सोडतीला बसल्याचे समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्यस्थांना आळा घालणे आणि मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी इंटिग्रेडेट लॉटरी मॅनेजमेंट सिस्टीम (आयएलएमएस) २.० या नवीन संगणकप्रणालीद्वारे सोडत काढण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबईतील मुख्यालयाने घेतला आहे. त्यानुसार घरांसाठी अर्ज भरताना पॅनकार्ड, आधारकार्ड, रहिवासी दाखला (डोमेसाइल), उत्पन्नाचा दाखला किंवा आयकर प्रमाणपत्र, शपथपत्र, छायाचित्र, ई-स्वाक्षरी आणि स्वीकृतीपत्र आदी सात कागदपत्रे संगणकप्रणालीत अपलोड करायची आहेत. या कागदपत्रांच्या छाननीला मोठा विलंब लागत आहे. त्यामुळे नागरिकांची निराशा झाली आहे.

हेही वाचा – पुणे : बारामतीमध्ये ‘एमआयडीसी’चे स्वतंत्र प्रादेशिक कार्यालय

म्हाडाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत घरांसाठी ५९ हजार ७४६ जणांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी ३३ हजार २९१ जणांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. ३० हजार ६२३ जणांचे पॅन कार्ड प्रमाणीकरण झाले आहे. १७ हजार २५६ जणांनी रहिवास दाखला जोडला असून त्यापैकी ८१३३ जणांचे रहिवास दाखल्यांचे प्रमाणीकरण झाले आहे, तर ९१२३ जणांनी जुने रहिवास दाखले जोडले आहेत. दहा हजार ४२० जणांनी उत्पन्नाचे दाखले जोडले असून, त्यापैकी ७५३५ जणांचे दाखले प्रमाणित झाले आहेत. पूर्ण अर्ज भरलेले ५९७९ अर्ज असून त्यापैकी केवळ १८७१ अर्जधारकांच्या कागदपत्रांची छाननी पूर्ण झाली आहे. कागदपत्रांच्या प्रमाणीकरणाला वेळ लागत असल्याने आणि अर्ज भरताना संगणकप्रणालीत अडथळे येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

या नव्या संगणकप्रणालीत त्रुटी असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केले होते. त्यानंतर म्हाडाच्या वरिष्ठांनी तातडीने बैठक घेऊन नवीन रहिवास दाखल्याची अट शिथिल करत जुना रहिवास दाखलाही ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला. मात्र, इतर कागदपत्रांच्या प्रमाणीकरणाला विलंब लागत असल्याने घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

हेही वाचा – पुणे : मुंबईला गोमांस घेवून जाणारा टेम्पो पकडला, खडकी भागात दोन टन गोमांस जप्त

म्हाडा पुणे मंडळाच्या ऑनलाइन सोडतीसाठी आतापर्यंत प्राप्त अर्जांपैकी पूर्ण प्रक्रिया झालेले सहा हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांमध्ये संबंधित अर्जदारांनी जोडलेल्या कागदपत्रांचे प्रमाणीकरण निश्चित करण्यात आले आहे. संगणकप्रणालीत कोणत्याही त्रुटी नसून वेगाने कामकाज सुरू आहे, असे आयएलएसएम प्रणाली, मुख्य अभियंता जितेंद्र जोशी यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New computer system affected mhada lottery in pune pune print news psg 17 ssb