पुणे, मुंबई : एकीकडे राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या या आठवडय़ात अचानक ५००च्या वर गेली असताना नवी चिंता निर्माण झाली आहे. करोनाच्या ओमायक्रॅान विषाणूचे नवे उत्परिवर्तन असलेले बीए.४ आणि बीए.५ चे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. या प्रकारांचे सात रुग्ण पुणे शहरात सापडल्याने दक्षता घेण्यात येत आहे. 

पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या समन्वयाने सुरू असणाऱ्या जनुकीय क्रमनिर्धारण सर्वेक्षणाच्या ताज्या अहवालानुसार ही माहिती पुढे आली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने शनिवारी आपल्या दैनंदिन अहवालातून याबाबत माहिती दिली आहे. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने (आयसर) केलेल्या जनुकीय तपासणीत हे नवे प्रकार आढळले असून फरिदाबाद येथील इंडियन बायोलॉजिकल डेटा सेंटर (आयबीडीसी) या संस्थेने त्यास दुजोरा दिला आहे. 

राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, हे सर्व रुग्ण पुणे शहरातील आणि ४ मे ते १८ मे २०२२ या कालावधीतील आहेत. त्यांत चार पुरुष, तर तीन महिला आहेत. चार रुग्ण ५० वर्षांवरील वयोगटातील तर दोन २० ते ४० वर्षे वयोगटातील आहेत. एक रुग्ण नऊ वर्षांचा आहे. दोन रुग्णांचा दक्षिण आफ्रिका आणि बेल्जियम प्रवास झाला आहे. तिघांनी केरळ आणि कर्नाटक येथे प्रवास केला आहे. उर्वरित दोन रुग्णांनी प्रवास केलेला नाही. नऊ वर्षे वयाचा मुलगा सोडल्यास इतर सर्वाचे करोना लसीकरण पूर्ण झाले आहे.

विषाणूचा नवा प्रकार आढळला असला तरी हा प्रकार ओमायक्रॉन प्रकारातील असल्यामुळे सध्या तरी त्याचा फारसा धोका नाही. तसेच रुग्णसंख्या वाढत असली तरी ओमायक्रॉनच्या तिसऱ्या लाटेच्या तुलनेत हा वेग कमी आहे. पुढील काही दिवस रुग्णसंख्येत वाढ होत राहील, परंतु रुग्णालयात दाखल रुग्ण आणि मृत्यू यांचे प्रमाण कमी राहिल्यास चिंतेचे कारण नाही. या दृष्टीने या दोन्ही बाबींवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे, असे करोना कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले.

भीती का?

बीए.४ आणि बीए.५ हे ओमायक्रॉनचे प्रकार आहेत. या प्रकारच्या विषाणूच्या प्रादुर्भावाचा वेग लक्षणीय असल्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील रुग्णआलेखावरून आढळले आहे. 

मुखपट्टी पुन्हा आवश्यक?

मुख्यमंत्र्यांनी काहीच दिवसांपूर्वी मुखपट्टी वापरण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. त्यातच गेल्या दोन दिवसांत मुंबईतील रुग्णसंख्या ३००हून अधिक झाली. दैनंदिन रुग्णसंख्या एक हजारावर गेल्यास काही प्रमाणात निर्बंध लागू शकतात, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी शनिवारी दिली.

खबरदारी हवीच..

ओमायक्रॉनच्या नव्या रुग्णांना करोनाची सौम्य लक्षणे होती. कुणालाही रुग्णालयात भरती करण्याची गरज भासलेली नाही. प्रत्येकाला घरगुती विलगीकरणात उपचार देण्यात आले. आता सर्व रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत.

मुंबईत रुग्णवाढ सुरूच

गेल्या चार-पाच दिवसांपासून मुंबईत रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मुंबईत शनिवारी ३३० नवे रुग्ण आढळले. त्यापैकी २० जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले असून ३१० जणांना कोणतीही लक्षणे नाहीत. रुग्णवाढीचा दर ०.०२२ टक्क्यांवर पोहोचला आहे. मृत्यू दर नियंत्रणात आहे. दरम्यान, ठाणे जिल्ह्यात शनिवारी ८० रुग्ण आढळले.

पर्यटनस्थळी लसीकरण..

गेट वे ऑफ इंडिया, जहांगीर आर्ट गॅलरी, छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान, अंधेरीतील महाकाली गुंफा, आरे वसाहतीतील छोटा काश्मिर बोटींग क्लब, कुर्ला येथील स्नो वल्र्ड फिनीक्स सीटी आणि घाटकोपरमधील किडझानिया आरसीटी मॉल अशा आठ ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

सध्या प्रतिबंधात्मक उपायांचे पालन अजिबात केले जात नाही. बंद जागेत मुखपट्टीचा वापर आवश्यक आहे. परंतु हे देखील होत नसल्याने प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून रुग्णालयांमधील तयारी आणि प्राणवायूची गरज यांचा आढावा घेणे गरजेचे आहे. 

– डॉ. राहुल पंडित, सदस्य, करोना कृती दल

Story img Loader