शहरातील तीनही नाटय़गृहांच्या दुरवस्थेचा विषय ऐरणीवर असतानाच आगामी वर्षांत आकुर्डी व सांगवीत भव्य नाटय़गृह उभारणीचे काम सुरू करण्याचा निर्धार आयुक्तांनी व्यक्त केला आहे. दुरवस्थेची कबुली देतानाच ‘पुढचे पाठ मागचे सपाट’ असे होणार नसल्याची खात्री आयुक्तांनी दिली असून कलाधोरणाच्या निमित्ताने मांडलेल्या सूचनांचा विचार नव्या नाटय़गृहांमध्ये होईल, अशी ग्वाही दिली आहे.
चिंचवडचे रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, पिंपरीचे आचार्य अत्रे रंगमंदिर आणि दोन वर्षांपूर्वी सुरू झालेले भोसरीतील अंकुशराव लांडगे नाटय़गृह या तीनही नाटय़गृहांची सध्या प्रचंड दुरवस्था आहे. कोटय़वधी रुपये खर्च करून उभारलेल्या नाटय़गृहांमधून पालिकेला अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. खर्चाचे आकडे मात्र प्रचंड मोठे आहेत.  व्यासपीठापासून ते स्वच्छतागृह, मेकअप रूम, उपाहारगृह आदींविषयी सातत्याने तक्रारी होतात. नाटय़गृहात तारीख मिळवणे दिव्य पार पाडण्यासारखे आहे. तारखांची उघडपणे दलाली चालते, नाटय़गृहातील उद्योगी मंडळी संगनमताने पालिकेला खड्डय़ात घालतात व स्वत:ची तुंबडी भरतात. ध्वनिक्षेपकांमध्ये जाणीवपूर्वक बिघाड केले जातात. वातानुकूलित यंत्रणा फक्त ‘व्हीआयपी’ आल्यानंतरच सुरू होते. त्याच्या दुरुस्तीच्या नावाने लाखोंची बिले काढली जातात. स्वच्छतागृहांच्या दरुगधीची कायम ओरड होते. नाटय़गृहांमध्ये दारूच्या पाटर्य़ा झोडल्या जातात. मात्र, अशा तक्रारींची दखल घेतली जात नाही.
तब्बल २५ कोटी खर्चून उभारलेल्या भोसरी नाटय़गृहातील कलादालन का सुरू होत नाही, हे अनाकलनीय आहे. उपाहारगृह सुरू नसल्याने प्रेक्षक व कलाकारांची गैरसोय होते. चहा जरी प्यायचा म्हटले तरी थेट रस्त्यावर यावे लागते. वाहनतळाचा ठेका नसल्याने पालिकेचे हक्काचे उत्पन्न बुडते. चिंचवड व पिंपरीतील नाटय़गृहात खुच्र्या नादुरुस्त व पडदे जिर्ण झालेत, यासारख्या तक्रारी सातत्याने मांडूनही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. कलाकार तक्रार करतात, संस्था निवेदने देतात. मात्र, परिस्थिती कायम आहे. अर्थसंकल्पाच्या पत्रकार परिषदेत बोलताना आयुक्तांनी नाटय़गृहांची दुरवस्था मान्य केली व यापुढे त्याकडे अधिक गांभीर्याने पाहिले जाईल, अशी ग्वाही दिली. सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी केलेल्या सूचनांची दखल घेतली असून नव्या नाटय़गृहात तशा सुविधा देण्याचा प्रयत्न करू, असे सांगत नाटय़संस्थांच्या कलाकारांना रंगीत तालमीसाठी तेथे जागा उपलब्ध करून दिली जाईल, असे ते म्हणाले.

Story img Loader