राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून (नॅक) होणाऱ्या प्रणालीत कागदपत्रांच्या संकलनात प्राचार्यांचा बराच वेळ जातो. त्यामुळे आता मूल्यांकनासाठी विकसित करण्यात येत असलेल्या नव्या संगणकीय प्रणालीत ऑनलाइन तंत्रज्ञानावर भर असल्याने मानवी हस्तक्षेप कमी होईल. तसेच नव्या प्रणालीअंतर्गत विद्यापीठे आणि महाविद्यालयांना त्यांची माहिती संकेतस्थळावर सार्वजनिकरीत्या प्रसिद्ध करावी लागणार आहे.

त्यामुळे मूल्यांकन प्रक्रियेत पारदर्शकता येऊन नागरिकांनाही शैक्षणिक संस्थांची माहिती उपलब्ध होईल, अशी माहिती नॅकच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी दिली.  सेंटर फॉर एज्युकेशनल डेव्हलपमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशनद्वारे (सेडा) ‘महाविद्यालय मूल्यांकन संकल्पना आणि पद्धतीतील बदल’ या संदर्भात शैक्षणिक परिषदेवेळी डॉ. पटवर्धन बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्रा. के. पी. मोहन, सेडाचे अध्यक्ष प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे, सचिव धनंजय कुलकर्णी आदी उपस्थित होते. या परिषदेत पुणे शहरातील प्राचार्य, कुलगुरू आणि संस्थाचालकांनी सहभाग घेऊन शंकाचे निरसन केले. 

हेही वाचा : खतांच्या वेष्टनावरही आता पंतप्रधान; ‘जन खत’ योजनेच्या उल्लेखाची कंपन्यांवर सक्ती; ऑक्टोबरपासून अंमलबजावणी

डॉ. पटवर्धन म्हणाले, की नॅक मूल्यांकनाला सामोरे जाताना शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचे ध्येय असायला हवे. सध्याच्या मूल्यांकन प्रणालीत प्राचार्यांचा बरासचा वेळ कागदपत्रांच्या संकलनात जात असल्याने ही प्रक्रिया अन्य प्रक्रियांसारखी होते. त्यामुळे महाविद्यालयांच्या गुणवत्ता तपासणीसाठी नवी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात येत आहे. या प्रणालीत ऑनलाइन तंत्रज्ञानावर भर असल्याने मानवी हस्तक्षेप कमी होईल. तसेच मनुष्यबळ, खर्च आणि वेळेची ३० टक्क्यांपर्यत बचत होईल. येत्या दीड महिन्यात उच्चस्तरीय समितीकडून प्रणालीचा मसूदा तयार झाल्यावर, पुढील वर्षापासून नवी प्रणालीची अंमलबजावणी सुरू होईल.

हेही वाचा : ‘पॅसिव्ह स्मोकिंग’मुळे कर्करोगाचा सर्वाधिक धोका; भक्ती बिसुरे

नॅकच्या मूल्यांकन प्रणालीत सकारात्मक बदल करण्यासाठी प्राध्यापक, प्राचार्य आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या घटकांकडून सूचना अपेक्षित आहे. उच्च शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी आणि त्याचा विकासासाठी सर्वांनी पुढे यायला हवे. नॅक मूल्यांकनाच्या प्रक्रियेत परीक्षा पद्धती, अध्ययन निष्पती, मूक्स, प्राध्यापकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम याला महत्त्व येणार असल्याचे प्रा. के. पी. मोहन यांनी सांगितले.