‘अनादि मी अनंत मी’ नाटकात खाडिलकरांची नवी पिढी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वातंत्र्यवीर सावरकर या व्यक्तिमत्त्वाची पूजा बांधणारे खाडिलकर कुटुंब ‘सावरकर भक्ती’मध्ये रंगलंय. समग्र सावरकर उलगडणाऱ्या ‘अनादि मी अनंत मी’ या नाटकामध्ये पूर्वी प्रसिद्ध गायिका आशा खाडिलकर आणि माधव खाडिलकर काम करीत होते. या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला मंगळवारी ३५ वर्षे पूर्ण होत असताना खाडिलकर दाम्पत्याचा मुलगा ओंकार, कन्या वेदश्री आणि स्नुषा प्राजक्ता अशी नवी पिढी या नाटकात काम करीत आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मशताब्दी वर्षांत म्हणजे १९८३ मध्ये माधव खाडिलकर यांनी ‘अनादि मी अनंत मी’ हे नाटक लिहिले. २६ फेब्रुवारी या सावरकर यांच्या स्मृतिदिनी शिवाजी मंदिर येथे या नाटकाचा पहिला प्रयोग झाला होता. लेखक, दिग्दर्शक असलेल्या माधव खाडिलकर यांनी सावरकर यांची भूमिका साकारली होती. या नाटकाला संगीत देणाऱ्या आशा खाडिलकर यांनी माई सावरकर यांची भूमिका साकारली होती. या नाटकामध्ये बाल सावरकर यांची भूमिका  साकारणारा ओंकार आता पुनर्निमित नाटकामध्ये सावरकर यांची भूमिका करत आहे.

ओंकार खाडिलकर म्हणाले, ‘अनादि मी अनंत मी’ या नाटकाचे आई-बाबांनी १९९० पर्यंत दीडशे प्रयोग केले. सावरकर यांच्या पन्नासाव्या आत्मार्पणदिनी, २६ फेब्रुवारी २०१६ रोजी मी नाटय़ाभिवाचन केले. ते पाहून ‘तू हे नाटक का करत नाहीस’, असे बाबांनी मला विचारले. आई-बाबा यांनी  स्थापन केलेल्या ‘उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट’मार्फत मी नाटकाची निर्मिती केली आहे. यामध्ये बाबाराव सावरकर यांची पत्नी येसूवहिनी ही भूमिका वेदश्री करते. प्राजक्ता हिने माई सावरकर यांची भूमिका केली असून ती ‘जयोस्तुते’ या गीतावर कथक नृत्याविष्कार साकारते.

नाटक ध्वनिनाटय़ स्वरूपात

‘अनादि मी अनंत मी’ या नाटकाची संहिता आधुनिक माध्यमात जतन व्हावी या उद्देशातून हे नाटक ध्वनिनाटय़ स्वरूपात आणण्याचे ठरविले आहे. ऑडिओ बुक आणि वेब सिरीज या माध्यमातून युवा पिढी वाचन करते आणि पाहते. त्यामुळे या नाटकाचे ऑडिओ स्वरूपातील ध्वनिमुद्रण करण्यात येत असून नाटक चार-पाच भागात ऑडिओ अ‍ॅपद्वारे जतन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे यू-टय़ूबवरही हे नाटक पाहता येईल, असे ओंकार खाडिलकर यांनी सांगितले.