दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर झालेले आंदोलन व अण्णा हजारे यांच्या आंदोलनातील प्रतिसाद पाहता नव्या पिढीला गांधी व त्यांची मूल्य हवी आहेत. त्यामुळेच आपण एका मोठय़ा बदलाच्या उंबरठय़ावर उभे आहोत, असे मत गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष व उद्योगपती अभय फिरोदिया यांनी व्यक्त केले.
सोसायटीच्या वतीने गांधी जयंतीच्या निमित्ताने देण्यात येणाऱ्या ‘बा- बापू’ तसेच ‘विधायक कार्यकर्ता पुरस्कारां’चे वितरण बुधवारी ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी फिरोदिया बोलत होते. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांना ‘बापू’ पुरस्कार, तर इंदूर येथील कस्तुरबा गांधी मेमोरियल ट्रस्टच्या विश्वस्त सुरेन्द्र सैनी यांना ‘बा’ पुरस्काराने गौरविण्यात आले. न्यू पनवेलच्या पंचदीप संकुलाच्या मीनल टिपणीस व ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी ‘विधायक कार्यकर्ता पुरस्कार’ देण्यात आला. सोसायटीच्या शोभना रानडे, डी. बी. शेकटकर आदी या वेळी उपस्थित होते.
फिरोदिया म्हणाले, की गांधी विचार व त्यांनी देशाला दिलेली प्रेरणा दिवसेंदिवस वाढतच आहे. इतिहासाबद्दल कुतूहल कमी असले, तरी तरुण मंडळींना गांधींबद्दलची उत्सुकता आजच्या काळात सर्वाधिक आहे. गांधीजींनी विचारसरणीला सामान्य माणसांपर्यंत पोहोचविले. सर्व लोकांना त्यांनी स्फूर्ती दिली. त्यांच्यापूर्वी नेत्यांनी इंग्रजांशी बोलणी केली, विविध मार्गाने दबाव आणला. पण, सर्वसामान्यांना उभे करण्याचे काम गांधींनी केले. आजच्या तरुणाईला त्यांचे आकर्षण आहे.
माशेलकर म्हणाले, की माझ्यासाठी हा सर्वात संस्मरणीय पुरस्कार आहे. गांधीजींचे महत्त्व विसाव्या शतकापेक्षाही एकविसाव्या शतकामध्ये जास्त आहे. सैनी म्हणाल्या, की आपल्यासमोर सध्या खूप आव्हाने आहेत. त्याला सामोरे कसे जायचे याचा विचार झाला पाहिजे. गांधीजींनी आपल्याला एक आदर्श व दिशा दिली आहे. त्या दिशेने आपल्याला जावे लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा