कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची ओळख नव्या पिढीला झाली पाहिजे. रयत शिक्षण संस्थेने भरवलेल्या प्रदर्शनातून कर्मवीरांच्या जीवनाची ओळख निश्चितपणे होईल आणि त्यातून प्रेरणाही मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी केले.
रयत शिक्षण संस्थेतर्फे आयोजित कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षांनिमित्त महाप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. हडपसर येथील साधना क्रीडा संकुलात सोमवार (१४ ऑक्टोबर) पर्यंत हे प्रदर्शन खुले आहे. कर्मवीरांच्या जीवनावरील भव्य रंगावली हे देखील या प्रदर्शनाचे वैशिष्टय़ आहे. महापौर चंचला कोद्रे, विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे, आमदार बापू पठारे, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. रावसाहेब शिंदे, स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे आदींची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती.
प्रदर्शनामुळे कर्मवीरांचे जीवन सर्वाना समजेल आणि त्यांच्या जीवनापासून प्रेरणा देखील मिळेल. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये सुप्त गुण असतात. ते गुण ओळखून त्यांचा विकास करणे आवश्यक आहे. नव्या पिढीतील गुण ओळखून त्यांचा विकास केला जावा, अशी अपेक्षा पवार यांनी या वेळी बोलताना व्यक्त केली.
सर्व प्रकारच्या अडीअडचणींवर मात करून लोकांकडून गोळा केलेल्या निधीतून रयत शिक्षण संस्थेची उभारणी झाली आहे. या गोष्टीचे भान सदैव ठेवले गेले पाहिजे. शिक्षणासाठी मोठय़ा प्रमाणावर निधी खर्च होत असला, तरी शिक्षणाची गुणवत्ता मात्र वाढलेली नाही. त्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्याचे आव्हान शिक्षणसंस्थांना स्वीकारावे लागणार आहे. त्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची कास धरावी लागेल, असे वळसे म्हणाले. विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या या संस्थेने केवळ गुणांवर लक्ष केंद्रित न करता विध्यार्थ्यांमधील सर्व गुण व कौशल्य विकसित होतील यासाठी देखील काम करावे, असे आवाहन वळसे यांनी या वेळी बोलताना केले. सल्लागार समितीचे अध्यक्ष राम कांडगे यांनी प्रास्ताविक केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New generation will motivate from the life of karmaveer
Show comments