एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी राष्ट्रीय व राज्य महामार्गावर काही ठरावीक टप्प्यांवरील हॉटेलवर अधिकृत थांबे देण्याचे एसटीचे धोरण असून, त्यानुसार विविध मार्गावर थांबे देण्यात येत आहेत. पुणे विभागात पुणे- इंदापूर व ताम्हिणी घाटमार्गावर लवकरच असे थांबे देण्यात येणार आहेत. हे थांबे देताना संबंधित हॉटेलवरील सर्व सुविधा लक्षात घेतल्या जाणार असल्याने खवय्यागिरी करण्याबरोबरच स्वच्छतागृहासारख्या सुविधाही प्रवाशांना ठरावीक टप्प्यांवर उपलब्ध होणार आहेत.
भोजन किंवा नास्त्याच्या वेळेत प्रवासात असल्यानंतर पूर्वी अनेकदा रस्त्यालगतच्या ठरावीक ठिकाणी एसटीच्या गाडय़ा थांबविल्या जात होत्या. मात्र, हे थांबे अधिकृत नसल्याने तेथे प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधांबाबतही लक्ष पुरविले जात नव्हते. त्यानंतर एसटीने ठरावीक टप्प्यांवरील हॉटेलवर अधिकृत थांबे देण्याचे धोरण आखले. त्यानुसार राष्ट्रीय व राज्य महामार्गावर असे विविध थांबे देण्यात येत आहेत. या थांब्यांवर मिळणाऱ्या सुविधांबाबत एसटीकडून दखल घेण्यात येत असल्याने प्रवाशांना या थांब्यांवर चांगल्या सुविधा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या थांब्यांच्या माध्यमातून एसटीच्या उत्पन्नातही भर पडणार आहे.
पुणे विभागामध्ये पुणे- इंदापूर मार्गावर भिगवणपर्यंत व पुणे- ताम्हिणीमार्गे आदरवाडीपर्यंत म्हणजेच पुण्यापासून ५० किलोमीटरच्या पुढील अंतरावर हॉटेलचे नवे थांबे देण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधितांकडून निविदाही मागविण्यात आल्या आहेत. संबंधित हॉटेलना मासिक परवाना शुल्कावर ‘लिव्ह अ‍ॅण्ड लायसन्स’ पद्धतीने हे थांबे चालविण्यास देण्यात येणार आहेत. थांबे चालविण्यास घेणाऱ्या हॉटेल चालकाकडून तेथे मद्य विक्री होत नसल्याचे हमीपत्र घेतले जाणार आहेत. त्याचप्रमाणे स्वच्छतागृहाची व्यवस्था तसेच हॉटेलच्या स्वच्छतेबाबतही लक्ष दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे हॉटेलकडे आवश्यक क्षमतेची डांबरीकरण केलेली पार्किंगची व्यवस्था गरजेची आहे. हॉटेल व इमारत दाखला, हॉटेल चालविण्याचा अनुभव असलेला दाखला, अन्न व औषध प्रशासनाचा परवाना आदी तांत्रिक गोष्टीही पाहिल्या जाणार आहेत.
 हॉटेलच्या ठिकाणी परमिट रूम, बार, बीअर शॉपी आदी असल्यास त्या ठिकाणी थांबा दिला जाणार नाही. वाहक व चालक यांना हॉटेल चालकांनी पैसे दिल्याचे सिद्ध झाल्यास या हॉटेलच्या थांब्याचा परवाना रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकले जाणार आहे. पुणे- इंदापूर मार्गावर एसटीच्या साध्या ७५, तर १० निमआराम बस दिवसाला धावतात. ताम्हिणी घाटमार्गे दिवसाला साध्या आठ, तर निमआराम चार गाडय़ा धावतात. त्यानुसार संबंधित हॉटेलचालकांकडून एसटीला प्रतिबस उत्पन्न मिळणार आहे.

Story img Loader