हिरवाईने नटलेला सुंदर आणि सुरक्षित देश.. भ्रष्टाचार नसलेल्या देशांमध्ये अग्रभागी असलेला.. पुण्यापेक्षाही कमी लोकसंख्या असलेला.. स्त्रियांना मतदानाचा अधिकार देणारा आणि मूक-बधिरांसाठी खुणांच्या सांकेतिक भाषेला (साइन लँग्वेज) अधिकृत भाषेचा दर्जा देणारा पहिला देश.. एकही हिंस्र प्राणी नसलेला देश.. पर्यटन हाच मुख्य व्यवसाय आणि एक तासाच्या बातम्यांमध्ये क्रीडाविषयक बातम्यांना अर्धा तास देणारा.. कल्याणी गाडगीळ यांनी दिलेल्या या नावीन्यपूर्ण माहितीसह न्यूझीलंड देशाची वैशिष्टय़े सामवारी उलगडली.
कॉन्टिनेन्टल प्रकाशनतर्फे कल्याणी गाडगीळ यांच्या ‘न्यूझीलंड- दक्षिण गोलार्धातील नंदनवन’ या पुस्तकाचे प्रकाशन ‘अंतर्नाद’ मासिकाचे संपादक भानू काळे यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
भानू काळे म्हणाले, न्यूझीलंड या देशाशी सामान्य माणसांचा संबंध हा क्रिकेटपटूंची नावे माहीत असण्यापलीकडे नसतो. एव्हरेस्टवीर म्हणून एडमंड हिलरी हे न्यूझीलंडचे हे देखील काहींना माहीत असते. पण, या देशाविषयी सामान्यांच्या नजरेतून दिली गेलेली माहिती उद्बोधक आहे. केवळ प्रवासवर्णन असे या पुस्तकाचे स्वरूप न राहता प्रवासाद्वारे आपण आनंद कसा घेऊ शकतो याचे मार्गदर्शन करणारे हे पुस्तक म्हणजे ‘प्रवाश्यांचा वाटाडय़ा’ आहे.
माधवी वैद्य म्हणाल्या, कल्याणी गाडगीळ यांनी भारतीयांच्या चष्म्यातून न्यूझीलंडची वैशिष्टय़े उलगडली आहेत. यामध्ये न्यूझीलंडच्या भाषेचा छोटेखानी कोश दिला असून त्याद्वारे ती भाषा बोलण्यास कोणताही अडचण येणार नाही याची दक्षता घेतली आहे. प्रकाशिका देवयानी कुलकर्णी-अभ्यंकर यांनी प्रास्ताविक केले. आशा नगरकर यांनी सूत्रसंचालन केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा