लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: प्रलोभन देऊन धर्मांतर करणे हा गुन्हा आहे. त्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. मात्र, अशा प्रकारचा कायदा अस्तित्वात असताना ‘लव्ह जिहाद’ची भीती दाखवून नवा कायदा आणला जात आहे, असं परखड मत मुस्लिम सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष शमशुद्दीन तांबोळी यांनी व्यक्त केलं आहे.

तांबोळी यावेळेस बोलताना म्हणाले की, ‘मुस्लिम समाजात बकऱ्यांची कुर्बानी दिली जाते. जात धर्माच्या पलीकडे जाण्यासाठी बकरी ईदच्या दिवशी आम्ही रक्तदान, देहदान आणि अवयवदान हाती घेतले आहे. आंतरधर्मीय सुसंवाद, विवाह राबवतो आहोत. प्रलोभन देऊन धर्मांतर करणे हा गुन्हा आहे. त्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. मात्र, अशा प्रकारचा कायदा अस्तित्वात असताना ‘लव्ह जिहाद’ची भीती दाखवून नवा कायदा आणला जात आहे.

गांधीजींचा आदर्श समोर ठेऊन याविरोधात लढा देणार आहोत. ‘पहले किताब कभी नही हिजाब’ हा गांधींचा मार्ग आहे. त्यावर आम्ही चाललो आहोत. गांधी आणि मी असे जेव्हा म्हणतो, तेव्हा हे किती कठीण काम आहे, हे कळते. गांधी, फुले, बोस यांनी मुस्लिम समाजासाठी जितकं केलं ते एकाही मुस्लिम नेत्याने केलं नाही. मुस्लिम तत्ववाद्यांबरोबरच हिंदुत्ववाद्यांविरोधातही मुस्लिम सत्यशोधक मंडळ लढत आहे, असं देखील तांबोळी यावेळेस म्हणाले.

लेखक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानखेडे यावेळेस व्यक्त होताना म्हणाले, मराठी साहित्यातील अनेक शब्दप्रभुंनी देखील ‘गांधीवध’ हा शब्द सर्रास वापरला आहे. हा शब्द राक्षसांसाठी वापरला जातो. म्हणजे गांधी राक्षस, तर नथुराम हा परमेश्वर झाला. हा सांस्कृतिक वर्चस्ववाद आहे. संघाचे शताब्दी वर्ष साजरे होत असताना स्वातंत्र्यलढ्यात संघ का नव्हता?, यावर चर्चा होताना दिसत नाही. त्याऐवजी गांधींनी नेहरूंनाच का निवडले?, भगतसिंग यांच्या फाशीला विरोध का केला नाही?, असे प्रश्न स्वातंत्र्यलढ्यातील गांधींबद्दल उपस्थित केले जातात. हा सांस्कृतिक वर्चस्ववाद आहे, असं देखील वानखेडे म्हणाले.

गांधी स्मारक निधीतर्फे गांधी भवन येथे आयोजित गांधी विचार साहित्य संमेलनात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मुस्लिम सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष शमशुद्दीन तांबोळी यांच्यासोबत लेखक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानखेडे, ज्येष्ठ संपादक श्रीराम पवार, उद्योजक अरुण फिरोदिया उपस्थित होते.

Story img Loader