पुणे : अपघातात गंभीर जखमी झाल्याने मेंदूमृत घोषित केलेल्या व्यक्तीमुळे तिघांना जीवदान मिळाले आहे. या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी त्याच्या अवयवदानास परवानगी दिल्याने हे शक्य झाले आहे.
पिंपरी-चिंचवडमधील डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अपघातात जखमी झालेल्या ४० वर्षीय व्यक्तीवर उपचार सुरू होते. त्याला डॉक्टरांनी २९ मे रोजी मेंदूमृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी आणि ५ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. त्याच्या कुटुंबीयांनी अवयव दानास परवानगी दिली. त्याचे हृदय, मूत्रपिंडे, यकृत, स्वादुपिंड आणि नेत्रपटल दान करण्यासाठी कुटुंबीयांनी परवानगी दिली.
हेही वाचा >>> “पुण्यातील काँग्रेस भवन म्हणजे…”, सोशल मीडियावरील पोस्टनंतर भाजप-काँग्रेसमध्ये राडा
पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्राच्या निकषानुसार डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील एका रूग्णाला मूत्रपिंड व स्वादुपिंड आणि दुसऱ्या रुग्णाला मूत्रपिंड व यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. यातील पहिला रुग्ण अहमदनगरमधील ३० वर्षांचा तरुण होता. तो टाईप-१ मधुमेहामुळे मूत्रपिंड विकाराने ग्रस्त होता. तो सात वर्षांपासून प्रतीक्षा यादीत होता. दुसरा रुग्ण हा ५० वर्षांचा होता आणि तो यकृत व मूत्रपिंड विकाराने ग्रस्त होता. त्यांच्यावर एकाच दिवशी यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आल्या. याचबरोबर पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात एका रुग्णाला हृदय प्रत्यारोपण करण्यात आले.
हेही वाचा >>> पुणे पाठोपाठ आता ‘मावळ’ही आमचे!, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते…
कार्यालयात जात असताना हा व्यक्ती अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्याला मेंदूमृत जाहीर करण्यात आले होते. ही घटना कुटुंबासाठी अनपेक्षित आघात होता परंतु मानवतेच्या दृष्टिकोनातून कुटुंबाने अवयवदानाचा धाडसी निर्णय घेतला. -डॉ. वृषाली पाटील, कार्यक्रम संचालक, डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल