पुणे : शिवाजीनगर येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) नवीन बस स्थानक सर्व सोयी सुविधांनी आणि अत्याधुनिक संकल्पनेनुसार साकारण्यात येणार आहे. याठिकाणी बहुद्देशीय वाहतूक केंद्रासाठी (मल्टी मोडेल हब) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि महामेट्रो यांच्यात लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार आहे. त्यानुसार सार्वजनिक, खासगी आणि भागीदारी (पीपीपी) तत्वानुसार महामेट्रो संपूर्ण वाहतुकीच्या दळवळणाला अनुसरून हे केंद्र बनविण्यात येणार आहे.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून शिवाजीनगर येथील बहुद्देशीय वाहतूक केंद्रााचे काम रखडले होते. त्या पार्श्वभूमीवर आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी या प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पवार सोमवारी शिवाजीनगर येथील मेट्रोच्या स्थानकाबद्दल आणि ‘एसटी’महामंडळाच्या बस स्थानकासंदर्भाच्या कामकाजाची आढावा बैठक घेतली. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
पवार यांनी यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी संपर्क साधून महामंडळ आणि महामेट्रो यांच्यामध्ये संयुक्त विकासासाठी सामंजस्य करार करण्यासंदर्भात संपर्क साधून चर्चा केली. त्यानंतर सचिवांना तातडीने या कामासंदर्भात करार करून निविदा प्रक्रिया राबवून तातडीने काम सुरु करावे, अशा सूचना केल्या.
हेही वाचा…अचानक मोठ्या आवाजाने जाग आली आणि…, जखमी तरुणाचा अंगावर काटा आणणारा अनुभव
का झाला विलंब ?
महामेट्रोच्या भूमिगत स्थानकाच्या बांधकामासाठी शिवाजीनगर येथील बस स्थानक तात्पुरत्या स्वरूपात वाकडेवाडी स्थलांतरीत करण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या स्थानकाच्या ठिकाणी बहुद्देशीय केंद्राबाबत वारंवार निर्णय बदलण्यात आले. त्यामुळे महामेट्रो आणि एसटी महामंडळाच्या स्थानकात या सर्व सोयी सुविधांचा बृहत आराखडा बनविताना महामंडळ आणि महामेट्रोच्या आराखड्यात एकवाक्यता होत नसल्याने हे काम रखडले होते.
प्प्रवाशांना सुविधा मिळणार
शिवाजीनगर येथील बहुद्देशीय वाहतूक केंद्रासाठी महामेट्रो आणि एसटी महामंडळासोबत सामंजस्य करार करण्यात येणार आहे. त्यानुसार आराखडा तयार करण्यात येणार असून प्रवाशांना आधुनिक सोयी सुविधांना अनुसरून गोष्टीचा समावेश करण्यात येणार आहे. तसेच वातानुुकलीत प्रतिक्षा कक्ष, बैठक व्यवस्था आणि इतर वस्तु खरेदीसाठी केंद्र आदी सुविधांचा लाभ घेता येणार असून एसटीच्या प्रवाशांना याचा चांगला फायदा होणार आहे.