पोटतिडकीने पेट बाळगण्याची मौज करणारे प्राणिपालक आपल्या सवंगडय़ांना घरातील सदस्याहून वेगळे मानत नसल्याने, त्यांच्या हौसेलाही सीमा नसते. घरातील लहान मुलांवर जो जिव्हाळा आणि कौतुकाचा मारा होतो, तसाच प्रकार आपल्या पेटबाबतही केला जात आहे. सुरुवातीला प्राणी-पक्ष्यांच्या खाद्य आणि आरोग्याच्या उत्पादनांसोबत काही चैनीच्या गोष्टींपुरती उपलब्ध होती. कालांतराने प्राणिपालकांची गरज आणि आवड पाहता यात अनेक नव्या ट्रेण्ड्सचा शिरकाव झाला. बाजारपेठेमध्ये ‘पेटफोलिओ’ म्हणजेच पाळीव प्राण्यांची छायाचित्रे टिपण्याचा उद्योग गेल्या काही वर्षांमध्ये स्थिरावू पाहतोय. आपल्याकडील श्वान, मांजर, दुर्मीळ जातीच्या पक्ष्यांची छायाचित्र मालिका किंवा व्हिडीओ क्लिप्स बनवून त्यांच्या गुणवैशिष्टय़ांची खासगी नोंद ठेवण्यासाठी, प्रदर्शने पेटस्पर्धामध्ये मिरविण्यासाठी पेटपालक लाखो रुपये खर्चायला तयार आहेत.
घरात असणाऱ्या प्राण्याशी भावनिक नाते तयार होते. प्राण्यांचा खोडकरपणा, वैशिष्टय़ कॅमेराकैद करण्यासाठी ‘पेटफोलिओ’च्या संकल्पनेचा उदय झाला. श्वान-मांजराच्या कौतुकभरल्या छब्यांचे अल्बम करून, त्याचे व्हिडीओज समाजमाध्यमांमध्ये पसरविणाऱ्या प्राणिपूजकांची संख्या वाढत चालली आहे. एखाद्या देखण्या मॉडेलच्या लांबलचक चालणाऱ्या फोटो-व्हिडीओशूटसारखा हा प्रकार आता मुंबई-पुणे आणि देशातील महानगरांमधील पेट बाजारात बऱ्यापैकी रुजला आहे. फक्त पेटफोलिओ बनवून देणाऱ्या संस्था आहेत आणि त्यांत फक्त पाळीव प्राण्यांची देखणी आणि लक्षणीय छबी टिपण्याचा वकुब असलेली कॅमेराधारी फौज तयार झाली आहे. पाचशे रुपयांपासून ते दोन लाख रुपये इतके बक्कळ मानधन घेऊन हे पेटछबी बनवून देणारे कलाकार प्राणिपालकांच्या आनंदासाठी नवनव्या संकल्पना घेऊन येत आहेत.
आमचे ‘पेट’ सुरेख बाई..
सध्या पशुउत्पादने तयार करणाऱ्या कंपन्या, देशोदेशीचे क्लब यांच्याकडून प्राण्यांच्या ऑनलाईन सौंदर्य स्पर्धा घेण्याचे पेव गेल्या काही वर्षांपासून फोफावले आहे. ऑनलाईन मतदानाच्या आधारे या स्पर्धेत प्राण्यांना क्रमांक दिले जातात. या स्पर्धानी पाळीव प्राण्यांची छायाचित्रे टिपण्याच्या उद्योगाला उभारी दिली.
श्वान आणि मांजरांच्या ‘ब्रिडींगवर’ लाखो रुपयांचा व्यवसाय करणारी यंत्रणा देशात रुजली आहे. समाजमाध्यमांवर ही यंत्रणा आपल्या पेट्सची माहिती सचित्र पुरविते. त्यामुळे आपल्या पेटला अनुरूप वंशाच्या, जातीच्या प्राण्याची निवड करता यावी यासाठी खुले व्यासपीठ तयार करण्यासाठी पेटफोलिओ तयार केले जात आहेत. कित्येकदा आपला श्वान वा मांजर किती आनंदात आहेत, हे दाखविण्याचा सोस प्राणिमालकांमध्ये असतो. पेट फोटोग्राफी किंवा व्हिडीओग्राफी पंधरा मिनिटांपासून ते दिवसभर चालते. या काळात श्वानाचा नट्टा-पट्टा आणि नूर टिकवून कॅमेऱ्यात त्याची सवरेत्कृष्ट छबी कैद होण्यासाठी प्राणिमालक आणि कॅमेरामन अपार कष्ट करतात. प्राणी कॅमेरा आणि आजूबाजूच्या गदारोळाला बुजू नये, यासाठी किल्ला लढविण्याइतके श्रम छायाचित्रकाराला करावे लागतात.
काळाची गरज
घरात जन्मलेल्या बाळाच्या विकासाचे टप्पे स्मृतिबद्ध करणे आत्ताच्या तंत्रसाक्षर पिढीला सामान्य वाटते. तरीही खास समारंभांसाठी प्रशिक्षित छायाचित्रकाराला बोलावले जाते. त्याचप्रकारे आपल्या पेटच्या गमती-जमतींच्या क्षणांना कॅमेऱ्यात पकडणेही सर्वसाधारण बनत आहे. चांगला कॅमेरा असणाऱ्या मोबाइल फोनमध्ये पेटधारक हे रोज करतात. पण यातले तज्ज्ञ आणखी पुढे जाऊन देखण्या पेटक्षणाला अचूक पकडतात. आज कुटुंबाच्या व्याख्येतही प्राण्याचा शिरकाव झाल्यामुळे जाहिरातींमध्ये सुखी कुटुंब दाखविताना पेट अनिवार्यच असते. पोस्टर्ससाठी, उत्पादनांच्या जाहिरातींसाठी प्राण्यांचेही मॉडेलिंग चालते. फोटो काढून घेण्यास सरावलेले पेट्स आपल्या मालकांना मॉडेलिंगमधून पैसेही मिळवून देत आहेत. चित्रपट, मालिका आणि जाहिरातीत वापरता येतील, म्हणून देखील पेटफोलिओ काळाची गरज बनली आहे. पण यासोबत निव्वळ आपल्या लाडाने वाढविलेल्या पेटच्या आनंदाची खूण आयुष्यभर जपण्यासाठी देखील प्राणिपालक अधिकाधिक या ट्रेण्डकडे आकृष्ट होत आहेत.