राज्यात यावर्षीपासून अकरावीला व्यवसाय शिक्षणाचा (एमसीव्हीसी) नवा अभ्यासक्रम लागू होत असून त्यानुसार ३० विषयांऐवजी २० विषय असणार आहेत. राष्ट्रीय कौशल्य विकास प्राधिकरणाने निश्चित केलेल्या राष्ट्रीय व्यावसायिक मानकांनुसार नव्या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. तब्बल दहा वर्षांनंतर हा अभ्यासक्रम बदलण्यात आला आहे.

अकरावीच्या व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमात यंदाच्या वर्षीपासून बदल होत आहेत. नव्या तंत्रज्ञानावर आधारित नवा अभ्यासक्रम यावर्षीपासून लागू करण्यात येणार आहे. अकरावीचा अभ्यासक्रम यंदा, तर बारावीचा अभ्यासक्रम पुढील वर्षी बदलणार आहे. राज्यात १९८७ साली व्यवसाय शिक्षण उच्च माध्यमिक स्तरावर सुरू करण्यात आले. त्यानंतर २००५ – ०६ मध्ये या अभ्यासक्रमांत थोडेसे बदल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर तब्बल दहा वर्षे बदल झाले नाहीत. एकीकडे सातत्याने नवे तंत्रज्ञान अमलात येत असताना हा अभ्यासक्रम मात्र जुनाट असल्यामुळे त्यासाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसादही कमी होऊ लागला होता. मात्र आता राष्ट्रीय व्यावसायिक मानकांनुसार नव्या अभ्यासक्रमाची रचना केली आहे.
जुन्या अभ्यासक्रमात तांत्रिक गटामध्ये इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी, मेंटेनन्स अॅन्ड रिपेअर्स या स्वतंत्र विषयांऐवजी इलेक्ट्रिकल टेक्नोलॉजी अंतर्गत या गोष्टींच्या अभ्यासाचा समावेश असेल. या शाखेत आठ विषय होते. मात्र प्रस्तावित नवीन अभ्यासक्रमात ते सहा करण्यात आले. वाणिज्य गटात सहा विषय होते, आता ते चार करण्यात आले आहेत. कृषी गटात डेअरी, पोल्ट्री प्रॉडक्शन यांमधील कौशल्ये एकत्र करून अॅनिमल हजबन्डरी अॅण्ड ेअरी टेक्नोलॉजी असा स्वतंत्र अभ्यासक्रम तयार केला आहे. कृषी गटात सात ऐवजी तीन विषय असणार आहेत. मत्स्य गटात दोनऐवजी एक, अर्धवैद्यकीय गटात पूर्वीप्रमाणेच परंतु सुधारित चारच विषय रहाणार आहेत.

मूल्यमापन व्यावसायिकांकडून
सध्या प्रात्यक्षिकांचे मूल्यमापन शिक्षकांकडूनच करण्यात येते. नव्या आराखडय़ानुसार व्यावसायिकांकडून विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन करण्याचे प्रस्तावित आहे. राष्ट्रीय कौशल्य विकास आराखडय़ात ठरवण्यात आलेल्या निकषांनुसार मूल्यमापनासाठी स्वतंत्र यंत्रणा राज्य, जिल्हा पातळीवर उभी करण्यात येऊ शकते, असे घुमे यांनी सांगितले.

गेल्या काही काळात तंत्रज्ञान खूप विकसित झाले आहे. त्या अनुषंगाने नॅशनल स्किल क्वॉलिफिकेशन फ्रेमवर्कच्या लेवल दोन व तीन नुसार हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला. २००५ साली अभ्यासक्रमात दहा ते पंधरा टक्के बदल झाला होता. दरम्यान तंत्रज्ञानात मोठय़ा प्रमाणात बदल झाले. त्यामुळेच नव्या अभ्यासक्रमात जवळपास ७० ते ८० टक्के बदल करण्यात आले आहेत.
राजेंद्र घुमे, पुणे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी

Story img Loader