राज्यात गुटखा बंदी झाल्यानंतरही छुप्या पद्धतीने गुटखा विक्री केली जात आहे. गुटखा वाहतूक मोठय़ा प्रमाणात शक्य नसल्यामुळे छोटय़ा-छोटय़ा ‘कन्साइनमेन्ट’ द्वारे थेट विक्री करणाऱ्या दुकानदारांपर्यंत गुटखा पोहोचविला जात असल्याची पद्धत समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये या पद्धतीने गुटखा घेऊन जाणाऱ्यांना अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी अटक केली आहे. राज्यात गेल्या नऊ महिन्यात तब्बल १५ कोटींचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
राज्यात गुटखा विक्रीला २००५ साली बंदी घालण्यात आली, तरीही गुटखा विक्री सुरूच होती. २०११ मध्ये अन्न सुरक्षा कायदा लागू केल्यानंतर अनेक राज्यांमध्ये गुटखाबंदी करण्यात आली. महाराष्ट्रात २० जुलै २०१२ पासून गुटखा बंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार गुटखा, तंबाखू, निकोटीन आणि मॅग्नेशियम काबरेनेट असलेल्या कोणत्याही पदार्थाचे उत्पादन, विक्री, साठवणूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. विक्री अथवा साठवून करताना आढळून आल्यात त्याच्यावर कारवाई करून कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. देशात आतापर्यंत सतरा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशात गुटखाबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, बिहार, आंध्र प्रदेश, झारखंड, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, केरळ, दिल्ली, मिझोराम, ओडिसा, नागालँड, हरयाणा, मध्य प्रदेश, चंदीगड, सिक्कीम, पंजाब, राजस्थान यांचा समावेश आहे. मात्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या राज्यात गुटखाबंदी अमलात आलेली नाही. त्यामुळे प्रामुख्याने या दोन राज्यात गुटख्याचे उत्पादन करून तो छुप्या पद्धतीने बंदी असलेल्या राज्यात पाठविला जात असल्याचे गेल्या काही कारवायांमध्ये समोर आले आहे. बंदी असलेल्या राज्यात कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातून रेल्वेगाडय़ातून, त्याच बरोबर रस्त्याने छोटय़ा कन्साइनमेन्टमध्ये गुटखा पाठविला जातो.
गेल्या महिन्यात पुणे जिल्ह्य़ात अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी शिरूर तालुक्यात अशाच पद्धतीने वाहतूक होत असलेला गुटखा जप्त केला. त्याच बरोबर रेल्वे पोलिसांनी छोटय़ा पिशव्यामध्ये गुटखा घेऊन जाणाऱ्या तरूणांना अटक केली होती. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुटख्याचा छुप्या पद्धतीने व्यापार करणाऱ्यांची नवीन मोडस पद्धत वापरात आहे. छोटय़ा पिशव्या, कारमधून गुटखा पोहोचविला जात आहे. कारवाई होऊ नये म्हणून मोठा साठा घेऊन जाण्याचे हे व्यापारी टाळत आहेत. त्याच बरोबर गुटख्याच्या वाहतुकीसाठी रेल्वेचाही वापर केला जात असल्याचे दिसून आले आहे. कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला हा गुटखा प्रामुख्याने कर्नाटक आणि उत्तरप्रदेशातूनच आलेला आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून यावर लक्ष ठेवले जात आहे.
छोटय़ा ‘कन्साइनमेन्ट’द्वारे दुकानात पोहोचविला जातोय गुटखा!
राज्यात गुटखा बंदी झाल्यानंतरही छुप्या पद्धतीने गुटखा विक्री केली जात आहे. गुटखा वाहतूक मोठय़ा प्रमाणात शक्य नसल्यामुळे छोटय़ा-छोटय़ा ‘कन्साइनमेन्ट’ द्वारे थेट विक्री करणाऱ्या दुकानदारांपर्यंत गुटखा पोहोचविला जात असल्याची पद्धत समोर आली आहे.
आणखी वाचा
First published on: 13-04-2013 at 02:35 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New method of smuggling and sale of gutkha in maharashtra