पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) जुलै ऑगस्ट २०२५मध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी नव्या खासगी विद्यार्थ्यांनाही संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत फेब्रुवारी मार्चमधील परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेसाठी संधी दिली जात होती. मात्र, आता शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, या दृष्टीने नव्या खासगी विद्यार्थ्यांनाही परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे.

राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. फॉर्म नंबर १७ भरून खासगी विद्यार्थ्यांना दहावी-बारावीची परीक्षा देता येते. त्यानुसार जुलै-ऑगस्ट २०२५मध्ये होणारी परीक्षा खासगी पद्धतीने देण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन नावनोंदणी करावी लागणार आहे. त्यानुसार १५ एप्रिल ते १५ मे या कालावधीत ऑनलाइन अर्ज, शुल्क भरणे, नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीची मुद्रित प्रत, मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयात जमा करता येणार आहे. नव्या विद्यार्थ्यांना केवळ नियमित शुल्काद्वारेच दिलेल्या मुदतीत केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे. विलंब, अतिविलंब शुल्काची मुदत असणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

खासगी विद्यार्थ्यांनी दहावी, बारावीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी परीक्षा द्यायची असलेल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाचा सांकेतांक, विषय योजना, माध्यम, शाखा आणि इतर आवश्यक माहिती घेऊनच नोंदणी करावी. विद्यार्थ्यांना नावनोंदणी करताना त्यांच्या सध्याच्या पत्त्यातील जिल्हा, तालुका, विद्यार्थ्याने निवडलेल्या माध्यमानुसार शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाची यादी दिसेल. त्यातून विद्यार्थ्याने शाळा, महाविद्यालयाची निवड करायची आहे. संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाने परीक्षा अर्ज, प्रकल्प अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी, श्रेणी विषय अशा मूल्यमापनाची कार्यवाही करायची आहे. अधिक माहिती http://www.mahasscboard.in/ या संकेतस्थळावर देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मुक्त विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनाही संधी

महाराष्ट्र मुक्त विद्यालय मंडळामार्फत पाचवी, आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही दहावीसाठी खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी करता येईल. पात्र विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाइन देण्यात येणार आहे. नावनोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यावर त्यांनी परीक्षा अर्ज राज्य मंडळाने दिलेल्या मुदतीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आतापर्यंत फेब्रुवारी-मार्चच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनाच जुलै-ऑगस्टमधील पुरवणी परीक्षेत संधी दिली जात होती. मात्र, विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, या दृष्टीने नव्या विद्यार्थ्यांनाही पुरवणी परीक्षेत संधी दिली जाणार आहे. पहिल्यांदाच असा निर्णय घेण्यात आला आहे. – शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य मंडळ