स्वातंत्र्यदिनी घोषणेची शक्यता; नकाशाही प्रसिद्ध
पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय लवकरच सुरू होणार असून स्वातंत्र्यदिनी आयुक्तालयाची घोषणा होण्याची शक्यता आहे. स्वतंत्र पोलीस आयुक्तालयासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उभारण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. नव्या पोलीस आयुक्तालयाची हद्द व कार्यकक्षेचा नकाशादेखील प्रसिद्ध करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार वाढत असून गेल्या काही वर्षांत शहरातील गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. दिवसाढवळ्या नागरिकांच्या वाहनांची मोडतोड, टोळ्यांमधील संघर्षांतून होणारे खून, चोरी, लूटमार अशा गुन्ह्य़ांच्या संख्येत वाढ होत आहे. या पाश्र्वभूमीवर वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची मागणी नागरिकांकडून केली जात होती. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात राज्य राखीव पोलीस दलाच्या रामटेकडी येथील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवे पोलीस आयुक्तालय लवकरच सुरू करण्याचे सूतोवाच केले होते.
या संदर्भातील माहिती नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. पुणे पोलीस आयुक्तालयाकडून पिंपरीसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. तो मंजूर झाला आहे. स्वातंत्र्यदिनी नव्या पोलीस आयुक्तालयाची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा होण्याची शक्यता आहे. स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाल्यानंतर प्रत्यक्षात कामकाज सुरू होण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागेल. स्वतंत्र आयुक्तालयाच्या नवीन इमारतीसाठी जागादेखील निश्चित करण्यात आली आहे. प्राधिकरणातील इमारतीतून स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा कारभार चालेल.
स्वतंत्र पोलीस आयुक्तालयासाठी एक पोलीस आयुक्त, एक अतिरिक्त आयुक्त, दोन पोलीस उपायुक्त आणि सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक गृह विभागाकडून करण्यात येईल. पिंपरी पोलीस आयुक्तालयासाठी सध्या पुणे पोलिसांच्या मोटार परिवहन विभागाचा वापर करण्यात येईल. भविष्यात पिंपरीसाठी नवीन मोटार परिवहन विभागाची निर्मिती करण्यात येईल. तांत्रिक सुविधा व पायाभूत सुविधादेखील उभारण्यात येतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा