वाहन चालवण्याचा परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्राचे नवीन स्मार्ट कार्ड मिळणार आहे. याबाबत परिवहन विभागाने कर्नाटकातील कंपनीशी करार केला आहे. या कंपनीकडून १ जुलैपासून स्मार्ट कार्डचा पुरवठा होणार आहे. तोपर्यंत स्मार्ट कार्डसाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या स्मार्ट कार्डसाठी नागरिकांना तब्बल दोन महिन्यांपर्यंत वाट पाहावी लागत आहे.

हेही वाचा >>> आधार वैधतेसाठी १५ जूनची मुदत; विद्यार्थी, शिक्षकांना दिलासा

राज्यभरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात स्मार्ट कार्डचा तुटवडा असून, वाहनचालकांना परवाना आणि वाहननोंदणीच्या स्मार्ट कार्डसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. आरटीओ अधिकाऱ्यांकडून स्मार्ट कार्डबाबत सारवासारव केली जात आहे. असे असले, तरी वाहन चालवण्याचा परवाना आणि वाहन नोंदणीच्या प्रमाणपत्राचे स्मार्ट कार्ड मिळण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अखेर परिवहन विभागाने याची दखल घेत पावले उचलली.

हेही वाचा >>> विद्यापीठांच्या प्र-कुलगुरूंची निवड आता कुलगुरू, व्यवस्थापन परिषदेच्या हाती

परिवहन विभागाचा स्मार्ट कार्ड निर्मितीबाबतचा हैदराबादमधील रोझमार्टा कंपनीसोबतचा करार संपुष्टात आला आहे. त्यामुळे कर्नाटकातील मनिपाल टेक्नॉलॉजी कंपनीसोबत यासाठी करार करण्यात आला आहे. या कंपनीकडून दिवसाला ४५ हजार स्मार्ट कार्डचा पुरवठा होऊन राज्यभरातील आरटीओतील तुटवडा कमी होईल, असा परिवहन विभागाचा कयास आहे. नवीन कंपनीकडून स्मार्ट कार्डचा पुरवठा १ जुलैपासून होणार आहे. त्यासाठी अद्याप एक महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे तोपर्यंत नागरिकांना स्मार्ट कार्डसाठी प्रतीक्षा करावी लागेल. याचबरोबर राज्यातील केवळ पुणे, मुंबई, नागपूर या तीनच आरटीओंना स्मार्ट कार्डवर वाहनमालकाचे नाव आणि पत्ता छापण्याची परवानगी असेल, अशी माहिती परिवहन विभागातील सूत्रांनी दिली.

Story img Loader