लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता परीक्षेत (युजीसी नेट) आता नव्या विषयाची भर पडणार आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षेत आपत्ती व्यवस्थापन विषयाचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

युजीसीचे सचिव प्रा. मनीष जोशी यांनी या बाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले. सहायक प्राध्यापक पदासाठी, संशोधन पाठ्यवृत्तीसाठी युजीसी नेट परीक्षा वर्षातून जून आणि डिसेंबर अशी दोनवेळा घेतली जाते. यंदापासून पीएच.डी.च्या प्रवेशासाठीही याच परीक्षेचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय युजीसीने घेतला आहे. युजीसी नेट परीक्षेत सध्या ८३ विषय उपलब्ध आहेत. त्यात आता आपत्ती व्यवस्थापन विषयाचा समावेश करण्यात येणार आहे.

आणखी वाचा-राज्यात पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर वाढणार

तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारसीनुसार, युजीसी नेटसाठी उपलब्ध असलेल्या विषयांमध्ये आपत्ती व्यवस्थापन हा अतिरिक्त विषय म्हणून युजीसी नेटमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय आयोगाच्या ५८०व्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता डिसेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी आपत्ती व्यवस्थापन हा विषय उपलब्ध असणार आहे. या विषयासाठीचा अभ्यासक्रम https://www.ugcnetonline.in/ संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले.