पुणे : पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलचे काम पूर्ण होऊन अनेक महिन्यांनंतर ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. अखेर १० मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे नवीन टर्मिनलचे उद्घाटन करण्याचा मुहूर्त ठरला आहे. यानंतर ४ ते ६ आठवडे सुरक्षा चाचण्या पूर्ण केल्यानंतर नवीन टर्मिनलवरून विमान उड्डाण सुरू होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान मोदी एकाच वेळी ग्वाल्हेर, पुणे, आदमपूर, कोल्हापूर, जबलपूर, दिल्ली, लखनऊ या विमानतळांवरील नवीन टर्मिनल आणि अलिगड, आझमगड, चित्रकूट, मुरादाबाद आणि श्रावस्ती या विमानतळांचे उद्घाटन करणार आहेत. तसेच, वाराणसी, कडप्पा, हुबळी आणि बेळगाव या विमानतळांच्या नवीन टर्मिनलचे भूमिपूजन करणार आहेत. हे प्रकल्प एकूण १२ हजार ७०० कोटी रुपयांचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते १० मार्चला दुपारी १२ वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन होईल.

हेही वाचा >>>राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लोकसभेच्या किती जागा लढवणार? बारामतीत काय होणार? आमदार रोहित पवार म्हणतात…

नवीन टर्मिनलसाठी एकूण किंमत ४७५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. नवीन टर्मिनलचे काम पूर्ण होऊन काही महिने उलटले आहेत. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री जोतिरादित्य शिंदे यांनीही जानेवारी महिन्यात या टर्मिनलची पाहणी केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनीही पाहणी केली होती. टर्मिनलचे काम पूर्ण होऊही उद्घाटन होत नसल्याने अनेक राजकीय पक्षांनी आंदोनल केले होते. अखेर या टर्मिनलच्या उद्घाटनला मुहूर्त लाभला आहे. नवीन टर्मिनल सुरू झाल्यानंतर विमानतळाच्या जुन्या इमारतीचे नूतनीकरण सुरू केले जाणार आहे.

असे आहे नवीन टर्मिनल…

एकूण क्षेत्रफळ : ५२ हजार चौरस मीटर

तासाला प्रवासी क्षमता : ३ हजार

वार्षिक प्रवासी क्षमता : ९० लाख

वाहनतळ क्षमता  : १ हजार मोटारी

प्रवासी लिफ्ट : १५

सरकते जिने : ८

चेक-इन काऊंटर : ३४

एकूण खर्च – ४७५ कोटी रुपये

पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते १० मार्चला दूरदृश्य प्रणालीद्वारे होईल. उद्घाटनानंतर ४ ते ६ आठवडे नवीन टर्मिनलवर सुरक्षा चाचण्या होतील. त्यानंतर नवीन टर्मिनलवरून उड्डाणे सुरू होतील. – संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New terminal at pune airport inaugurated on march 10 by pm narendra modi pune print news stj 05 amy