पुणे स्थानकावरील भार कमी करण्याच्या दृष्टीने हडपसर व खडकी येथे टर्मिनल विकसित करून त्या ठिकाणाहून काही गाडय़ा सोडण्याचे नियोजन आहे. याबाबत राज्य शासनाशीही आम्ही चर्चा करत आहोत, अशी माहिती रेल्वेच्या पुणे विभागाचे व्यवस्थापक विशाल अगरवाल यांनी दिली.
‘इंडियन एक्स्प्रेस’च्या ‘आयडिया एक्स्चेंज’ या कार्यक्रमात ते बोलत होते. अगरवाल म्हणाले, पुणे स्थानकावर आता जागेची कमतरता हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न झाला आहे. त्यामुळे स्थानकापासून जवळच नवे टर्मिनल विकसित करण्याचा विचार करण्यात येत आहे. हडपसर येथे टर्मिनल विकसित करून त्या ठिकाणाहून उत्तरेकडील भागात जाणाऱ्या गाडय़ा सोडता येतील. घोरपडी येथे रेल्वेचे यार्ड असल्याने त्या ठिकाणाहून हडपसर येथे रेल्वे पोहोचणेही सोपे होणार आहे. दुसऱ्या बाजूला खडकी येथील स्थानक विकसित करण्याचा विचार आहे. त्या ठिकाणाहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाडय़ा सोडता येणे शक्य होणार आहे. या योजनेसाठी राज्य सरकारचे सहकार्य गरजेचे असून, त्या दृष्टीने आम्ही सरकारशीही चर्चा करीत आहोत. शिवाजीनगर स्थानकही विकसित करण्यात येणार असून, त्याचा विशेष प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे. या कामाच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. रेल्वेच्या जागेवर या ठिकाणी व्यावसायिक प्रकल्पही साकारण्यात येणार आहेत.
पुणे-लोणावळा लोकलबाबत ते म्हणाले, प्रवाशांच्या मागणीनुसार सध्या योग्य प्रमाणात लोकल धावत आहेत. सकाळी व संध्याकाळी लोकलला मोठी गर्दी असते. त्या काळात आणखी फेऱ्यांची मागणी होत आहे. मात्र, पुणे-लोणावळा दरम्यान दोनच मार्ग असल्याने आणखी फेऱ्या वाढविण्यावर मर्यादा येतात. मागील काही दिवसांमध्ये लोकलच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे लोकलच्या डब्यांच्या संख्येमध्येही वाढ करण्यात आली आहे. पुणे-लोणावळ्यासाठी तिसऱ्या मार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. हा मार्ग झाल्यानंतरच काही करणे शक्य होणार आहे. सध्या लोकल बारा डब्यांची करण्यात आली आहे. आणखी डबे वाढविण्यावरच विचार करण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी स्थानकावरील फलाटाची लांबी वाढवावी लागणार आहे.
पुणे-दौंड लोहमार्गाच्या विद्युतीकरणाबाबत ते म्हणाले, रेल्वे विकास निगमच्या माध्यमातून या विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. पुढील दोन वर्षांमध्ये हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या मार्गाचे विद्युतीकरण झाल्यास या मार्गावरील गाडय़ांची संख्या वाढविणे शक्य होईल.