केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे नवे स्वरूप उमेदवारांच्या डोक्याला खुराक देणारे ठरले असून ‘परीक्षा आव्हानात्मक आणि गुणवत्तेचा कस लावणारी होती’ अशी प्रतिक्रिया उमेदवारांमध्ये उमटत आहे. पहिल्यांदाच परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी ही परीक्षा अधिक लाभदायक ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा रविवारी संपली. नव्या परीक्षा पद्धतीनुसार घेण्यात आलेली ही पहिलीच परीक्षा होती. या परीक्षेमध्ये शिकलेल्या गोष्टींचा वापर करण्यासाठी संधी होती असे उमेदवार सांगत आहेत. स्वत:चा विचार करून तो मांडण्याची कुवत असलेले उमेदवारच या परीक्षेमध्ये यश मिळवू शकतील असे मत व्यक्त केले जाते आहे. रट्टा मारून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी मात्र ही परीक्षा कठीण ठरण्याची शक्यता आहे.
या वर्षी प्रथमच आयोगाने ‘एथिक्स अँड इंटिग्रिटी’ या विषयाचा परीक्षेमध्ये समावेश केला होता. भाषेच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूपही वेगळे होते. या परीक्षेमध्ये सर्व प्रश्न सोडवणे बंधनकारक करण्यात आले होते. प्रश्नांना असलेले पर्याय काढून टाकण्यात आले होते. या परीक्षेमध्ये लिहिण्याचे प्रमाणे वाढल्यामुळे वेळेशीही उमेदवारांना कसरत करावी लागली. भाषेच्या परीक्षेमध्येही निबंधांची आणि प्रश्नांची शब्द मर्यादा वाढवण्यात आली होती. संपूर्णपणे नव्या स्वरूपामध्ये झालेल्या या परीक्षेमध्ये नव्याने किंवा पहिल्यांदाच परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना लाभ होण्याची शक्यता आहे. ज्या उमेदवारांनी यापूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दिल्या आहेत, त्यांना मात्र हा नवे स्वरूप थोडेसे जड गेल्याचे उमेदवार सांगत आहेत. मात्र, परीक्षेच्या या नव्या स्वरूपाचे उमेदवारांकडूनही स्वागत होत आहे. परीक्षा आव्हानात्मक होती, मात्र, खरंच गुणवत्तेचा कस लावणारी होती, असे मत उमेदवारांमध्ये व्यक्त होत आहे.
इंग्रजी माध्यम व शहरी विद्यार्थ्यांसाठी लाभदायक
‘‘पहिल्यांदाच परीक्षा देणाऱ्या आणि इंग्रजी माध्यमात शिकलेल्या किंवा शहरी विद्यार्थ्यांना परीक्षेचे हे नवे स्वरूप अधिक लाभदायक ठरेल. या परीक्षेतील प्रश्न, त्याचे संदर्भ याबाबत जे उमेदवार विचार करू शकतात, विश्लेषण करू शकतात आणि त्याचबरोबर ते विचार योग्य भाषेमध्ये मांडू शकतात, असेच उमेदवार या परीक्षेमध्ये यशस्वी ठरतील. मात्र, परीक्षा पद्धतीमध्ये एवढे मोठे बदल केल्यानंतर शेवटची संधी असलेल्या उमेदवारांना आयोगाने एका वर्षांचा लाभ दिला पाहिजे.’’
– तुकाराम जाधव, द युनिक अ‍ॅकॅडमी

Story img Loader