जर्मनीतील पतीशी परस्परसंमतीने पुण्यातून घटस्फोट

पुणे : स्काइप, व्हॉट्स अ‍ॅप या तंत्रज्ञानचा वापर करून परदेशातून घटस्फोट घेण्यात आल्याची उदाहरणे आहेत. राज्य शासनाकडून आता कौटुंबिक न्यायालयासाठी व्हिडीओ अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून देशात तसेच परदेशात असलेल्या व्यक्तीशी कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीशांना संवाद साधता येणार आहे. पुण्यातील कोथरूड भागातील युवतीने जर्मनीत असलेल्या पतीबरोबर या अ‍ॅपच्या माध्यमातून नुकताच घटस्फोट घेतला.

स्काइपचा वापर करून परदेशातून घटस्फोट घेण्यात आल्याची उदाहरणे आहेत. स्काइपच्या माध्यमातून कौटुंबिक न्यायालयात दाखल असलेल्या खटल्याच्या सुनावणीसाठी परदेशातील व्यक्तीला तेथील न्यायालयात जावे लागते. मात्र, शासनाकडून विकसित करण्यात आलेल्या नव्या अ‍ॅपच्या माध्यमातून परदेशातील व्यक्तीला तेथील न्यायालयात जाण्याची गरज नाही. मोबाइलच्या माध्यमातून परदेशातील व्यक्ती कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश आणि समुपदेशकांशी संवाद साधू शकणार आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर करून जर्मनीतील एका संगणक अभियंत्याने नुकताच घटस्फोट घेतल्याचे शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालयातील सूत्रांनी सांगितले. परस्पर संमतीने घटस्फोट नुकताच घेण्यात आला. घटस्फोट घेणारे दाम्पत्य उच्चशिक्षित आहे. पती संगणक अभियंता आहे. पत्नी खासगी कंपनीत नोकरी करते. पत्नीचा पहिला विवाह झाला होता. पहिल्या पतीपासून तिला मुलगी झाली आहे. त्यानंतर २०११ मध्ये संगणक अभियंता असलेल्या युवकाने तिच्याशी विवाह केला होता. तिच्या मुलीला स्वीकारले होते. सहा ते सात वर्ष संसार सुरळीत चालला होता.

मात्र, दोघांमध्ये वाद झाल्याने सहा महिन्यांपूर्वी त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. गणेश कवडे यांच्यामार्फत दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यासंदर्भात कौटुंबिक न्यायालयात अर्ज सादर केला होता. याप्रकरणात पती सध्या नोकरीनिमित्त जर्मनी स्थायिक झाला आहे. पत्नी पुण्यात नोकरी करत आहेत. या व्हिडीओ अ‍ॅपची लिंक जर्मनीत असलेल्या पतीला पाठविण्यात आली होती. समुपदेशक आठवले यांनी  जर्मनीत असलेल्या पतीशी संवाद साधला होता. त्यानंतर कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश माधव काफरे यांनी त्याच्याशी संवाद साधला होता. परस्पर संमतीने दोघांनी नुकताच घटस्फोट घेतला. पत्नीला कोथरूड भागातील सदनिका देण्याचे पतीने मान्य केले, अशी माहिती अ‍ॅड. गणेश कवडे यांनी दिली.

न्यायालयात स्क्रीन

कौटुंबिक न्यायालयातील व्हिडीओ कक्षात जाऊन न्यायाधीशांना पक्षकारांशी संवाद साधवा लागतो. येत्या काही दिवसांत कौटुंबिक न्यायालयातील प्रत्येक कक्षात पडदा (स्क्रीन) बसविण्यात येणार आहे. न्यायालयात सुनावणी सुरू असताना पुढील सुनावणी कोणती आहे, याबाबतची माहिती पक्षकार तसेच नातेवाइकांना कळणार आहे. उच्च न्यायालय, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात अशा प्रकारची सुविधा आहे, अशी माहिती दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा अ‍ॅड. वैशाली चांदणे यांनी दिली.

Story img Loader