लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकांसाठी मोठय़ा प्रमाणात नव्या मतदारांची नोंद झाली आहे. पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा मिळून तब्बल ७५ हजार नवमतदारांची नोंदणी झाली आहे. चुरशीच्या लढती अपेक्षित असलेल्या तीनही लढतीत पहिल्यांदा मतदान करणाऱ्या या वर्गाचा कौल कोणाच्या पारडय़ात पडतो, यावरच शहराचे तीन आमदार ठरणार आहे.
पिंपरी विधानसभा मतदारसंघात लोकसभेला ३ लाख ६८ हजार मतदारांची नोंद होती. ऑगस्टअखेर त्यामध्ये १२ हजार मतांची वाढ झाली आहे. चिंचवड मतदारसंघाची संख्या चार लाख ५२ हजार होती. त्यामध्ये ३० ते ४० हजार मतांची वाढ झाली आहे. तर, भोसरी विधानसभेत ३ लाख ३४ हजार मतदार होते. त्यात २५ हजार मतदारांची वाढ झाल्याचे सांगण्यात येते. लोकसभा निवडणुकीत नवमतदारांनी भाजप व त्यांच्या मित्र पक्षांना मतदान केल्याचे दिसून आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तत्कालीन करिष्मा हे त्यामागचे प्रमुख कारण होते. आता बदलत्या परिस्थितीत व मोदी यांच्यासारख्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा चेहरा विधानसभेसाठी समोर नसताना हा वर्ग कोणाकडे झुकतो, यावर राजकीय समीकरणे रंगणार आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती होणे अपेक्षित आहे. त्यामुळे मोठय़ा संख्येने नोंदवल्या गेलेल्या युवा मतदारांचा कौलच निर्णायक ठरण्याचे स्पष्ट संकेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New voter election pimpri constituency