लोणावळा : नववर्ष स्वागतासाठी लोणावळा, खंडाळा परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर, तसेच लोणावळा, खंडाळ्यात ठिकठिकाणी कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाल्याने शहरभर कोंडी झाली.
नववर्ष स्वागतासाठी मंगळवारी सकाळपासून मुंबई, पुण्यातील पर्यटकांची लोणावळा, खंडाळा परिसरात गर्दी झाली. अनेकजण सहकुटुंब मोटारीतून दाखल झाले. मोठ्या संख्येने मोटारी रस्त्यावर आल्याने जु्न्या मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा परिसरात कोंडी झाली, तसेच लोणावळ्यातील गवळी वाडा परिसरात कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. खंडाळा गाव ते पोलीस प्रशिक्षण केंद्र दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांना कोंडीत अडकून पडावे लागले. लोणावळा शहरातून जाणाऱ्या जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या.
हे ही वाचा… पुणे : हजारो किलो मटण, मासळी, चिकनवर ताव; सामिष खवय्यांकडून सरत्या वर्षाला निरोप
अनेक पर्यटकांनी लोणावळा, खंडाळा परिसरातील बंगले, फार्म हाऊस आरक्षित केले होते. पवनानगर भागातील तंबू आरक्षित करण्यात आले होते. पर्यटकांचे स्वागत, तसेच मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लोणावळा, खंडाळ्यातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. वाहतूक नियोजन करण्यासाठी स्वतंत्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. मोठ्या संख्येने पर्यटक मोटारीतून दाखल झाल्याने ठिकठिकाणी कोंडी झाल्याची माहिती लोणावळा पोलिसांनी दिली.