नववर्षांचे स्वागत म्हणजे थंडीचा कडाका हे समीकरण असते. पण या वेळी ते बिघडले असून, हुडहुडी भरवणाऱ्या आणि नववर्षांच्या स्वागताचा उत्साह वाढवणाऱ्या त्या थंडीऐवजी काहीशा उबदार वातावरणात नवीन वर्षांचे स्वागत करावे लागणार आहे. मंगळवार आणि बुधवारी सकाळी किमान तापमान १४ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
देशात सध्या पूर्वेकडून येणारे वारे प्रभावी आहेत. कडाक्याच्या थंडीसाठी उत्तरेकडून वारे यावे लागतात. ते आले तर मस्त गारठा पसरतो. पण या वाऱ्यांवर मात करून पूर्वेकडील वाऱ्यांनी ताबा घेतला आहे. हे वारे येतात बंगालच्या उपसागरावरून. अर्थातच ते बाष्प घेऊन येतात. त्याचा परिणाम म्हणून थंडी वाढत नाही आणि तापमान सरासरीच्या वर राहते. तेच सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुण्यात पारा खाली जायला तयार नाही. सोमवारी तर तो १५.५ अंश सेल्सिअसपर्यंतच खाली उतरला. वस्तुत: डिसेंबरच्या अखेरच्या आठवडय़ात पुण्यात किमान तापमान ११.५ अंशांच्या आसपास असते. पण आता नोंदवल्या गेलेल्या तापमानात आणि त्यात बरीच तफावत आहे.
पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांमध्ये यात फार बदल होण्याची शक्यता नाही. ‘पुण्यात बुधवापर्यंत हवामानाची स्थिती आतासारखीच राहील. पुणे शहरात किमान तापमान १४ अंशांच्या आसपास कायम असेल. बुधवारनंतर थंडी काही प्रमाणात वाढेल आणि किमान तापमान खाली उतरेल,’ असे पुणे वेधशाळेच्या सूत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा