नव्या वर्षी शासकीय कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरमध्ये आठवडाअखेरीला लागून सलग सुटय़ांची मजा मिळणार आहे. मात्र, या वर्षांत रविवारी किंवा दोन सण एकाच दिवशी आल्यामुळे काही सुटय़ा बुडणारही आहेत.
ऑक्टोबर महिना हा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सहलींचा किंवा आरामाचा ठरू शकतो. या वर्षी सलग सुटय़ांची मजा ऑक्टोबरमध्ये मिळणार आहे. २ ऑक्टोबरला गुरूवारी गांधीजयंतीची सुटी आहे, लगेच शुक्रवारी ३ ऑक्टोबरला दसरा आहे, त्याला जोडून शनिवार-रविवारची सुटी मिळाली की ६ ऑक्टोबरला म्हणजे सोमवारी बकर ईदची सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ऑक्टोबरचा पहिला आठवडा बहुतेक कार्यालये बंदच राहणार आहेत. यावर्षी दिवाळी ऑक्टोबरमध्येच आहे. त्यामुळे महिन्याचा अखेरही सुटय़ांमध्येच जाणार आहे. दिवाळीच्या सुटयाही शनिवार-रविवारला जोडून आल्या आहेत. या वर्षी गुरूवारी, २३ ऑक्टोबरला लक्ष्मीपूजनाची सुटी आहे, शुक्रवारी, २४ ऑक्टोबरला बलिप्रतिपदेची सुटी आहे. भाऊबीज शनिवारी असल्यामुळे या दिवशीही बहुतेक शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाटच दिसणार आहे.
ऑक्टोबरप्रमाणेच ऑगस्टमध्येही सलग सुटय़ा मिळणार आहेत. शुक्रवारी, १५ ऑगस्टला स्वतंत्र्यदिनाची सुटी, त्याला जोडून शनिवार-रविवार आणि सोमवारी १८ ऑगस्टला पतेतीची सुटी मिळणार आहे. मात्र, यावर्षी गोकुळाष्टमी आणि पतेती एकाच दिवशी येत असल्यामुळे शाळा, महाविद्यालयांची एक सुटी कमी होणार आहे. यावर्षी धूलिवंदन (१७ मार्च) आणि गुढीपाडवा (३१ मार्च) सोमवारी येत आहे. त्यामुळे मार्चमध्येही आठवडा अखेरीला जोडून सुटय़ा घेण्याची संधी आहे. एप्रिलमध्ये आंबेडकर जयंती (१४ एप्रिल) सोमवारी आली आहे. मात्र, प्रजासत्ताक दिन आणि महावीर जयंती (१३ एप्रिल) रविवारी आल्यामुळे या सुटय़ा मात्र बुडणार आहेत.