नाटय़वेड जोपासणाऱ्या रसिकांना असलेले मराठी संगीत रंगभूमीचे विशेष आकर्षण ध्यानात घेऊन नववर्षांतील आणखी चार रविवार नाटय़प्रेमींना संगीत नाटके पाहण्याची पर्वणी लाभणार आहे; तीही जुन्या काळातील वैभवाची साक्ष देत. पारंपरिक पेहरावातील स्वयंसेवक रसिकांना अत्तर लावून आणि महिलांना गजरा भेट देत संगीत नाटकाच्या सुगंधासह आनंद द्विगुणित करणार आहेत.
लायन्स क्लब ऑफ पुणे सहकारनगर यांच्यातर्फे संगीत नाटक संवर्धन उपक्रमांतर्गत हा संगीत नाटकांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. याअंतर्गत भरत नाटय़ मंदिर येथे सलग पाच रविवारी सायंकाळी पाच वाजता संगीत नाटके आयोजित करण्यात येत आहेत. गेल्या रविवारी (५ जानेवारी) महाराष्ट्र कल्चरल सेंटर निर्मित ‘संगीत कुलवधू’ नाटकाने या महोत्सवाची सुरूवात झाली. भरत नाटय़ मंदिर निर्मित ‘कटय़ार काळजात घुसली’ (१२ जानेवारी), कलाद्वयी निर्मित ‘संगीत स्वयंवर’ (१९ जानेवारी) आणि राहें निर्मित ‘संगीत सौभद्र’ (२ फेब्रुवारी) ही नाटके होणार असून २६ जानेवारी रोजी ‘संगीत नाटकाची वाटचाल’ हा मराठी रंगभूमी निर्मित कार्यक्रम कीर्ती शिलेदार सादर करणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांमध्ये नाटय़संगीताची अभिरुची निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम आहे, अशी माहिती क्लबचे अध्यक्ष प्रसाद खंडागळे यांनी दिली.
महाराष्ट्र गंधर्व स्पर्धा
क्लबने गांधर्व महाविद्यालयाच्या सहकार्याने महाराष्ट्र गंधर्व नाटय़संगीत स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी गांधर्व महाविद्यालयाच्या फेसबुक आणि संकेतस्थळावर प्रवेशिका उपलब्ध असून स्पर्धकांनी आपल्या गायनाच्या सीडी आणून द्यावयाच्या आहेत. अंतिम फेरीत निवड झालेल्या स्पर्धकांना २५ जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यशाळेत ज्येष्ठ गायक रामदास कामत, ऑर्गनवादक राजीव परांजपे आणि संवादिनीवादक प्रमोद मराठे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. स्पर्धेची अंतिम फेरी २६ जानेवारी रोजी भरत नाटय़ मंदिर येथे होणार आहे. अधिक माहितीसाठी ९८२२६८३३४१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नववर्षांत रसिकांना संगीत नाटके पाहण्याची संधी
नाटय़वेड जोपासणाऱ्या रसिकांना असलेले मराठी संगीत रंगभूमीचे विशेष आकर्षण ध्यानात घेऊन नववर्षांतील आणखी चार रविवार नाटय़प्रेमींना संगीत नाटके पाहण्याची पर्वणी लाभणार आहे.
First published on: 07-01-2014 at 02:41 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New year musical drama opportunity