Sinhagad Fort New Zealand tourist Video Viral: पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर न्यूझीलंड मधील पर्यटक पर्यटनासाठी आला असता त्याला मराठीतून शिव्या देण्यास भाग पाडणाऱ्या हुल्लडबाज तरुणांवर पुणे ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ऐतिहासिक अशा सिंहगड किल्ल्याची माहिती विदेशी पर्यटक व्लॉगमधून देत असताना काही तरूणांनी त्याला मराठीतून अश्लील शिवीगाळ करण्यास भाग पाडले. न्यूझीलंडच्या पर्यटकाच्या व्लॉगमधील संतापजनक प्रकाराचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली.

न्यूझीलंडमधील पर्यटकाचे नाव ल्युक असेून त्याने ल्युक द एक्सप्लोरर या त्याच्या युट्यूब वाहिनीवर ६ एप्रिल रोजी सदर व्हिडीओ अपलोड केला होता.

तब्बल एक तास तीन मिनिटांच्या या व्हिडीओत ल्युकने सिंहगड सर करताना लोकांशी झालेला संवाद आणि त्याला आलेला अनुभव कथन केला आहे. “दीस फोर्ट इन इंडिया इज इन्सेन” या शीर्षकाखाली ल्युकने सदर व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये काही तरूणांचे टोळके ल्युकला गाठून त्याला अपशब्द बोलण्यास भाग पाडतात. हे तरूण छत्रपती संभाजीनगर मधून आले असल्याचे सांगतात. ल्युकने इतरांना पाहून मराठीतून अपशब्द वापरावेत, यासाठी तरुणांचे टोळके ल्युकला उकसवत असल्याचे व्हायरल व्हिडीओत दिसत आहे.

सदर व्हिडीओची क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्स, सामाजिक कार्यकर्ते, इतिहास प्रेमी, स्वयंसेवक आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सदर हुल्लडबाज तरुणांवर कारवाई करण्याची मागणी केली. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या किल्ल्यांवर अशाप्रकारे विदेशी पर्यटकाला शिवीगाळ करण्यास भाग पाडणे योग्य नसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

अनेकांनी असंतोष व्यक्त केल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी हवेली पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी सांगितले की, आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम ४९, कलम ३०२ (जाणीवपूर्वक धार्मिक भावना दुखावणे), ३५१ (गुन्हेगारी धमकी) यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी पुढे सांगितले की, या प्रकरणी अद्याप आरोपींचा शोध सुरू आहे. व्हिडीओत दिसणाऱ्या आरोपींची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान ल्यूकने त्याच्या युट्यूब चॅनेलवर भारतातील अनेक ठिकाणचे व्हिडीओ शेअर केले आहेत. मुंबईतील धारावीमधील वस्ती, रायगड जिल्ह्यातील जंजिरा किल्ल्यावरही त्याने व्लॉग केले आहेत.

महाराष्ट्राच्या इतिहासात सिंहगड किल्ल्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच किल्ल्यावर १६७० रोजी झालेल्या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर सरदार तानाजी मालुसरे मुघलांशी लढताना धारातिर्थी पडले होते.