अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांना कार्यकारिणी स्थापन करण्याची परवानगी हवी असून त्यासाठी ते धर्मादाय आयुक्तांनाच साकडे घालणार आहेत. त्यामुळे मुंबईच्या १६ जागांचा प्रश्न प्रलंबित असताना नाटय़ परिषदेच्या निवडणुकीचे कवित्व अद्यापही संपलेले नाही याचेच हे द्योतक आहे.
नाटय़ परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मुंबई येथील १६ जागांसाठी झालेल्या मतदानामध्ये मतदारांपेक्षाही मतपत्रिकांची संख्या जवळपास दोन हजारांनी अधिक असल्याचे आढळून आले. या निवडणुकीमध्ये बनावट मतपत्रिकांचा सुळसुळाट झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास ठाकूर यांनी मुंबईची निवडणूक रद्दबादल ठरविली. मात्र, राज्यातील अन्य ठिकाणी झालेल्या निवडणुकीबाबत कोणतेही प्रवाद नसल्यामुळे त्या त्या ठिकाणचे निकाल जाहीर करण्याची सूचना संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. त्यानुसार मुंबई वगळता राज्यातील १९ ठिकाणी विजयी उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. ही निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच मराठवाडा विभागातील दोन जागांवर बिनविरोध निवड झाली होती. तर, महाराष्ट्राबाहेरील प्रतिनिधी म्हणून बेळगावच्या वीणा लोकूर यांची नियामक मंडळावर यापूर्वीच निवड झाली आहे. त्यामुळे सध्या नियामक मंडळाचे २२ सदस्य अस्तित्वात आहेत. या सर्वाना कार्यकारिणी स्थापन करण्यासाठी परवानही हवी आहे.
पुणे विभागातून ‘नटराज’ पॅनेलतर्फे विजयी झालेल्या सुनील महाजन यांनी ही ‘उत्स्फूर्त’ मागणी केली आहे. यासंदर्भात निवडून आलेले सर्व २२ सदस्य लवकरच धर्मादाय आयुक्तांची भेट घेणार असल्याचे सांगून महाजन म्हणाले, कोणतीही संस्था निरंतर सुरू राहणे महत्त्वाचे आहे. मुंबई येथील निवडणूक प्रक्रिया रद्द झाली आहे. तेथील निकाल लागेपर्यंत संस्थेचे कामकाज ठप्प होऊ देणे योग्य ठरणार नाही. लोकशाही मार्गाने निवडणुका झाल्या असून २२ सदस्यांची निवड झाली आहे. त्यांना कार्यकारिणी स्थापन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी धर्मादाय आयुक्तांना करण्यात येणार आहे. निवडणुका संपल्या असल्याने पॅनेल, गट-तट संपुष्टात आले असून आम्ही २२ जण आता नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य आहोत. मुंबईच्या निवडणुकीचा निकाल लागल्यावर त्यांनाही कार्यकारिणीमध्ये प्रतिनिधित्व देण्यात येणार आहे.
मराठवाडय़ातून बिनविरोध निवडून आलेले नाथा चितळे म्हणाले, नाटय़ परिषद ही केवळ मुंबईकरांची मक्तेदारी नाही. आता निवडून आलेल्या २२ जणांना कार्यकारिणी स्थापन करण्याची संधी मिळावी, अशी मागणी धर्मादाय आयुक्तांना करण्यात येणार आहे.
                                            
विजेत्यांना प्रमाणपत्रे प्रदान
निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास ठाकूर यांच्या सूचनेनुसार भाऊसाहेब भोईर, सुनील महाजन, समीर हंपी, दिलीप कोरके, प्रफुल्ल महाजन आणि शफी नायकवडी या पुणे विभागातून विजयी झालेल्या उमेदवारांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. विभागीय निवडणूक अधिकारी शिरीष जानोरकर यांनी विजेत्यांना प्रमाणपत्रे दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा