महिन्यापेक्षा जास्त काळ विश्रांती घेतल्यानंतर पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून, त्याने रविवारी व सोमवारी रात्री राज्याच्या अनेक भागांत हजेरी लावली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्याच्या बऱ्याचशा भागात पुढील तीनचार दिवस पावसाचे असणार आहेत. दरम्यान, मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, राजस्थानच्या वाळवंटाच्या काही भागातून तो बाहेर पडला.
पावसाने संपूर्ण ऑगस्ट महिन्यात अगदीच तुरळक हजेरी लावली. त्यामुळे राज्याच्या निम्म्या भागात पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. या पाश्र्वभूमीवर रविवारी बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. त्याचा परिणाम म्हणून राज्यातही पाऊस सक्रिय झाला. रविवारी सायंकाळी व रात्री अनेक ठिकाणी त्याने चांगलीच हजेरी लावली. पुण्यात सोमवारी सकाळर्पयच्या चोवीस तासांत १०.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याशिवाय मुंबई (६.४), कोल्हापूर (४.७), सोलापूर (१२.८), रत्नागिरी (२१.४), सातारा (६.७), सांगली (२१), परभणी (१५), अकोला (१२), भीरा (८) येथेही चांगल्या पावसाची नोंद झाली. सोमवारीसुद्धा पावसाने अनेक भागांत हजेरी लावली.
याबाबत पुणे वेधशाळेचे अधिकारी सतीश गावकर यांनी सांगितले, की आंध्र प्रदेशाजवळ निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र तिथेच स्थिर आहे. त्याच्या प्रभावामुळे सध्या पाऊस पडत आहे. पुढील तीन दिवसांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ात अनेक ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे. या काळात विदर्भाच्या काही भागांतही पावसाची शक्यता आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रवास कोणत्या दिशेने होतो, यावर पावसाची पुढील स्थिती अवलंबून असेल.
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू
मान्सूनचा परतीचा प्रवास राजस्थानच्या वाळवंटातून सोमवारी सुरू झाला. हा प्रवास सामान्यत: १ सप्टेंबरपासून सुरू होतो. तो या वेळी आठवडाभर उशिराने सुरू झाला. राजस्थानमधील गंगानगर, विकानेर, बारमेर या जिल्ह्य़ांच्या काही भागातून तो माघारी परतला. पुढच्या दोनतीन दिवसांत तो आणखी काही भागातून माघारी परतेल, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा