वेगवेगळ्या मार्गानी या देशामध्ये जातिअंतेचा लढा सुरू झाला पाहिजे. आंतरजातीय विवाह करणाऱ्यांनी या लढय़ाची सुरुवात केली आहे, मात्र त्यांच्या पुढच्या पिढीला जात लावली जाऊ नये, असे मत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
विष्णुपंत चितळे व श्रीपाद अमृत डांगे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भाई विष्णुपंत चितळे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘जातिअंताच्या मार्गाविषयी’ या व्याख्यानात आंबेडकर बोलत होते. डॉ. सुलभा ब्रह्मे अध्यक्षस्थानी होत्या.
आंबेडकर म्हणाले, लोकशाहीच्या माध्यमातून जातिअंताकडे घेऊन जाणारी व्यवस्था दुर्दैवाने दिसली नाही. जातीच्या लोकांना खेचून सत्तेवर येणे हा राजकीय पक्षांचा महत्त्वाचा भाग झाला. जात ही एक सुरक्षिततेचे कवच म्हणून नव्या व्यवस्थेत पाहिली जात आहे. त्यामुळे जातीतून बाहेर पडले जात नाही. पण, जातिअंताचा लढा वेगवेगळ्या मार्गाने सुरू झाला पाहिजे. शिक्षणामध्ये बारावीनंतर ७० टक्केपर्यंत गुण मिळविणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यांला त्याच्या इच्छेनुसार पुढील शिक्षण घेता आले पाहिजे. मागासवर्गीय युवकाची जातीची ओळख कमी करून त्याला खुल्या गटात आणण्याची प्रक्रिया सुरू केली पाहिजे. जे काही मिळाले ते माझ्या क्षमतेमुळे मिळाले, ही भावना त्याच्यात निर्माण झाली पाहिजे. जातीसाठी पर्यायी व्यवस्था निर्माण झाली, तर जात गळून पडेल.
आंतरजातीय विवाह ही जातिअंताच्या लढय़ाची एक सुरुवात आहे. मात्र, असा विवाह केलेल्यांच्या पुढच्या पिढीला जात लावील जाऊ नये. हे तातडीने होणार नाही, पण त्यामुळे काहीतरी फरक निश्चित पडेल. ज्याला जात सोडायची त्याला तशी संधी दिली जात नाही. शाळेच्या दाखल्यावर जात लावावी लागते. यात बदल होणे गरजेचे आहे. समाज व देशाची एकत्रितपणे उभारणी झाली पाहिजे. एका मर्यादित समूहापुरते नव्हे, तर व्यापक काम होणे गरजेचे आहे. मागासवर्गीय युवकांनी मागासवर्गीय असल्याच्या न्यूनगंडातून बाहेर पडले, तर मार्ग सापडेल. व्यवस्था ताब्यात घेऊन तिच्यात सुधारणा करण्याचा लढा, या युवकांनी लढावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा