आगामी ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाबमधील घुमानमध्ये होणार आहे. साहित्य महामंडळाच्या बैठकीमध्ये घुमानमध्ये संमेलन घेण्याचे निश्चित करण्यात आले. घुमान ही संत नामदेवांची कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱया आठवड्यात हे संमेलन होईल, असे महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आगामी साहित्य संमेलनासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे सर्वाधिक दहा निमंत्रणे आली होती. त्यामध्ये बडोदा आणि पंजाबमधील घुमान यासह राज्यातील आठ ठिकाणांचा समावेश होता. त्यापैकी बडोदा, घुमान आणि उस्मानाबाद यांसह पाच ठिकाणांना साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीतील सदस्यांनी भेट देऊन पाहणी केली होती. स्थळ निवड समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर साहित्य महामंडळाच्या बैठकीत पुण्यामध्ये त्यावर चर्चा झाली आणि घुमान येथे संमेलन घेण्याचे निश्चित करण्यात आले.
केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यामुळे बडोदा शहराचे पारडे जड मानले जात होते. मात्र, बैठकीमध्ये घुमानवरच शिक्कामोर्तब करण्यात आले. घुमानमध्ये संमेलन भरविण्यासाठी निमंत्रक म्हणून भारत देसरडा आणि संयोजक म्हणून सरहद संस्थेचे संजय नहार यांच्याकडून निमंत्रण आले असल्याचे वैद्य यांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा