पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सीसीटीव्ही बसविण्यासंदर्भात काम घेतलेल्या कंपनीशी शुक्रवारी गृहविभागाचे सचिव व इतर अधिकाऱ्यांनी चर्चा केली. शहरात ४४४ ठिकाणी बाराशे पंचेचाळीस कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करण्यासाठी कंपनीला ४२ आठवडय़ांची मुदत देण्यात आली असून सीसीटीव्ही बसविण्याचे काम पुढील आठवडय़ापासून सुरू होईल, अशी माहिती पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी दिली.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सीसीटीव्ही बसविण्यासंदर्भात पुणे पोलीस आयुक्तालयात गृहविभागाचे सचिव विनीत अगरवाल, अतिरिक्त सचिव अमिताभ राजन यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीला विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी विकास देशमुख, पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, सहपोलीस आयुक्त संजीवकुमार सिंघल, पुणे महापालिकेचे आयुक्त महेश पाठक, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, महावितरण, पाटबंधारे विभागाचे अभियंता आदी उपस्थित होते.
पोळ यांनी सांगितले, की पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सीसीटीव्ही बसविण्याचे काम मुंबई येथील मेसर्स अलाईड डिजिटल सव्‍‌र्हिसेस या कंपनीला देण्यात आले आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च २२४ कोटी रुपये असून पाच वर्षे देखभालीचे काम ही कंपनी करणार आहे. सीसीटीव्ही बसविण्यासाठी पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षेतेखाली एक प्रोजक्ट मॅनेजमेन्ट कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. या सर्वाची बैठक आज झाली. यानंतरची बैठक येत्या १३ नोव्हेंबर रोजी होणार असून त्यानंतर कंपनी सव्‍‌र्हे करून सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू करेल.
शहरातील सीसीटीव्हीचे मुख्य कंट्रोल रुम पोलीस आयुक्तालयात राहणार आहे. त्याचबरोबर विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस उपायुक्त, पोलीस ठाणे या ठिकाणी त्यांच्या हद्दीपुरते सीसीटीव्ही सव्‍‌र्हर राहणार आहे. कंपनीचे ३५ कर्मचारी चोवीस तास सीसीटीव्हीच्या चित्रीकरणावर देखरेख करणार आहेत. त्याला पोलीस कर्मचारी मदत करणार आहेत. त्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे पोळ यांनी सांगितले.
न्यायालयातही सीसीटीव्ही संदर्भात बैठक
शिवाजीनगर न्यायालयात सीसीटीव्ही बसविण्यासाठी तीन वर्षांपूर्वी दोन कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. पण, त्यावर कोणतीच कार्यवाही होत नसल्याने पुणे बार आसोसिएशन आणि न्यायालयाच्या अधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीला बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र उमाप, न्यायालयाचे वरिष्ठ व्यवस्थापक अतुल झेंडे, निबंधक दीपक झेंडे आदी उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. उमाप यांनी, न्यायालयात त्यांच्या वतीने तीस सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. त्यासाठी दोन दिवसांत पाहणी करून महत्वाच्या ठिकाणी हे कॅमेरे बसविले जातील, असे सांगितले.