श्रीराम ओक shriram.oak@expressindia.com
विशेष गरजा असणारी विविध मुले जशी या समाजात आहेत, तसेच त्यांच्यासाठी काम करणाऱ्या विविध संस्था, त्या संस्थांमधील शिक्षकही कार्यरत आहेत. या विविध संस्था, त्यांच्या शाळा, या शाळांमधून काम करणारे शिक्षक, या मुलांना शिकविण्याच्या पद्धती, या मुलांच्या जडणघडणीत पालकांचे योगदान या सगळ्यांमुळे ही मुले हळूहळू का होईना समाजात रुळत आहेत. समाजही त्यांना आपलेसे करून घेतो आहे आणि या मुलांनाही समाजातील व्यक्ती आपल्याशा वाटत आहेत, हे महत्त्वाचे. मागील अठ्ठावीस वर्ष सातत्याने या ‘विशेष मुलांसाठी’ झटणारी संस्था म्हणजे ‘प्रिझम फाउंडेशन’. या संस्थेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामुळे येथील मुलांमध्ये आणि त्यांच्यामध्ये जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे.
अध्ययन अक्षमता, मतिमंदत्व, संमिश्र अपंगत्व, बहुविकलांगता या सर्व प्रकारच्या समस्या असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणारी एक संस्था म्हणजे ‘प्रिझम फाउंडेशन’. विशेष मुलांसाठी काम करणाऱ्या या संस्थेचे पाच विभाग असून प्रत्येक विभागांमधले कार्य तेवढेच महत्त्वाचे. अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांसाठी ‘फिनिक्स’ तर संमिश्र अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘लार्क’. याशिवाय बेन्यू ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, माधवी ओगले व्यावसायिक शाळा, सृजनरंग कला अभिव्यक्ती केंद्र असे पाच विभाग असलेल्या या संस्थेला आंतरराष्ट्रीय आयएसओ ९००१-२०१५ देखील प्राप्त झालेले आहे.
‘विशेष गरजा असलेल्या मुलांमधील सुप्त गुणांचे क्षितिज विस्तारले जावे’ या पद्मजा गोडबोले यांच्या तीव्र इच्छेमधून १९९० साली प्रिझम फाउंडेशनचे बीज पेरले गेले. या बिजाला खतपाणी घालण्याचे महत्त्वाचे काम कै. माधवी ओगले आणि यशवंतराव पटवर्धन यांनी केले. प्रिझम फाउंडेशनच्या सर्वच कुटुंबीयांनी या छोटय़ाशा रोपटय़ाची प्रेमाने,आपुलकीने मशागत केली आहे. याबरोबरच मानांकन मिळाल्यामुळे संस्थेतील कामामधील गुणवत्तेत देखील भर पडली आणि प्रगतीचा मार्ग आणखी सुकर झाला आहे. प्रिझम फाउंडेशन ही संस्था धर्मादाय असून मुलांच्या हितासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असते.
जे विद्यार्थी अभ्यासात मागे पडतात अशा विद्यार्थ्यांसाठी फिनिक्स ही शाळा संस्थेमार्फत चालवली जाते. पूर्ण वेळ या मुलांना शिकविण्यासाठी विशेष पद्धती येथे वापरल्या जातात. विद्यार्थ्यांना आपआपल्या क्षमतेनुसार माध्यमिक शालान्त परीक्षा मंडळ व एनआयओएस मंडळाच्या परीक्षांना बसवले जाते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि गांधर्व महाविद्यालय येथे घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षा तसेच चित्रकला, नाटय़वाचन आदी स्पर्धामध्ये ही मुले इतर सर्वसाधारण मुलांबरोबर कोणत्याही सवलतीशिवाय सहभागी होतात. हे विद्यार्थी शैक्षणिक प्रभुत्वाबरोबरच आत्मविश्वास आणि सामाजिक कौशल्ये आत्मसात करीत त्यांची जीवनातील वाटचाल करतात, ती अर्थातच सुकर झालेली असते.
मतिमंदत्व, एपिलेप्सी, बहुविकलांग, थोडा वाचादोष, अस्थिर यांसारख्या एकापेक्षा जास्त समस्या असलेल्या विद्यार्थ्यांसाठी लार्क ही शाळा कार्यरत आहे. मतिमंदासाठी मतिमंद शाळा, अंधासाठी अंध शाळा, मूक बधिरांसाठी वेगळी शाळा, शारीरिक व्यंग असलेल्यासाठी स्वतंत्र शाळा असतात, परंतु लार्क शाळा ही सर्व विशेष शाळांपेक्षा वेगळी असून संमिश्र अपंगत्व असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच चालविली जाते. येथे येणाऱ्या प्रत्येक मुलाचा क्षमताधिष्ठित विकास घडविणे, स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगण्यासाठी आवश्यक कौशल्ये शिकविणे, मुलांना स्वत:च्या वेळेचा उपयोग करता येऊन समाजाचा एक घटक म्हणून जगायला शिकविणे हे लार्कचे उद्दिष्ट आहे.
शैक्षणिक प्रगती करू न शकणाऱ्या १८ ते २५ वयोगटातील विद्यार्थ्यांना व्यावहारिक शिक्षणाबरोबर व्यावसायिक प्रशिक्षण देणारी माधवी ओगले व्यावसायिक शाळा. कॅनिंग, पिंट्रिंग, फाइल बनविणे, पेपरच्या तसेच कापडाच्या पिशव्या बनविण्यासारखे उपक्रम येथे राबविले जातात. या मुलांना समाजाचा घटक म्हणून सतत कार्यरत राहता यावे, समान संधी तसेच अधिकार मिळावा हे या शाळेचे ध्येय आहे.
विशेष प्रक्षिणासंबंधी एक महिन्याच्या, एक किंवा दोन आठवडय़ाच्या प्रशिक्षण वर्गाचे नियोजन बेन्यू प्रशिक्षण या शाखेमार्फत केले जाते. शिक्षकांसाठी व पालकांसाठी चर्चासत्र आयोजित करून त्यांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न त्याद्वारे केला जातो. तसेच बाहेरील शिक्षक व पालक यांना प्रशिक्षण दिले जाते. या शाखेच्या माध्यमातून समाजामध्ये विशेष शिक्षणाबद्दलची जागरूकता व समज निर्माण केली जाते. क्षेत्रभेटी, कार्यशाळा, सादरीकरण यांच्याद्वारे शिक्षक, मुख्याध्यापक, निर्णयक्षम अधिकारी पोहचून अध्ययन अक्षमता असलेल्या संमिश्र अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांबाबत जागृती केली जाते. बेन्यू संस्थेतर्फे पुणे व पुण्याच्या आसपासच्या परिसरातील गावापर्यंत पोहोचून समाजातील शक्य तितक्या लोकांना विशेष शिक्षणाबद्दल जागरूक करणे, प्रशिक्षित करणे व विशेष विद्यार्थ्यांचे जीवन शक्य तितके सुलभ व्हावे यासाठी प्रयत्नरत राहणे, हे बेन्यूचे ध्येय आहे.
विविध कलांच्या माध्यमातून सुंदरतेचा, निर्मितीचा वेध मुलांच्या मनाला लागावा, त्यांचा आत्मविश्वास वाढून आपल्या क्षमतेप्रमाणे विकास व्हावा या उद्देशाने सृजनरंग कला अभियव्यक्ती केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. ताल, लय, संगीत याची जाण निर्माण होणे, रुजणे, मनातल्या इच्छा, भावना चित्रफलकावर उमटवणे, मातीशी नाळ जोडून मातीने हात बरबटून घेऊन निर्मिती करणे, गंमतगाण्यांचा-कवितांचा-गोष्टींचा आस्वाद घेत, शरीराच्या मुक्त हालचाली करत लयीवर थिरकणे, नाटय़ाद्वारे व्यक्त होणे, असे छोटे छोटे आनंद घेत, ताण दूर करत, संवेदनशीलता जपणे हा सृजनरंग कला अभिव्यक्ती केंद्राचा हेतू आहे. याच बरोबर अवधानकक्षा वाढविणे, वर्तमानात अपेक्षित बदल घडविणे, भावनिक-सामाजिक कौशल्य विकासासाठी या कलामाध्यमांचा उपचार पद्धती म्हणून वापर करणे हे सृजनरंगची महत्त्वाची उद्दिष्टे आहेत.
प्रभात रस्ता, गल्ली क्रमांक १५ येथे वसलेल्या या संस्थेत तिन्ही शाळा मिळून दोनशेपंचाहत्तर विद्यार्थी-विद्याíथनी आहेत, त्यांना शिकविण्यासाठी शिक्षक व कर्मचारी मिळून पंचाहत्तर जण कार्यरत आहेत. पुण्याच्या बाहेर पण विशेष विद्यार्थ्यांच्या समस्या ओळखून त्यांना त्यांच्याच ठिकाणी मदत करण्यात येत असल्याचे प्रिझम फाउंडेशनच्या संचालिका हर्षां मुळे यांनी सांगितले. तसेच ज्या ज्या ठिकाणी विशेष शाळा किंवा विशेष केंद्र सुरू करायचे आहे, तिथे प्रिझम फाउंडेशनकडून विशेष शिक्षण मार्गदर्शन देण्यात येत असल्याचेही त्या म्हणाल्या. १ जून रोजी संस्थेचा एकोणतिसावा वर्धापन दिन असून त्या निमित्ताने ‘व्यक्ती पुणे’ यांची निर्मिती असलेला ‘माँटुकले दिवस’ हा अभिवाचनाचा कार्यक्रमही सकाळी ९ वाजता संस्थेत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेच्या कामाचा परिचय करून घ्यायचा असेल किंवा संस्थेच्या कार्यात कोणत्याही प्रकारे योगदान द्यायचे झाल्यास (०२०) २५६७९७१४ किंवा ८९७५४०८८४० या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.
ही संस्था म्हणजे केवळ ज्ञानमंदिर नसून मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे तसेच पालकांनाही मुलांच्या वाढीसाठी सकारात्मकतेची दिशा देणारे आगळेवेगळे केंद्र आहे, जेथे विशेष मुलांसाठी विशेष मेहनत घ्यावी लागते.