श्रीराम ओक shriram.oak@expressindia.com

दुर्गम भागातून शिक्षणाच्या निमित्ताने पुण्यासारख्या शहरात आलेला, थोडासा बावचळलेला आणि चिंताक्रांत विद्यार्थी. पाणीटंचाईसारख्या अनेक समस्यांबरोबरच आर्थिक ओढग्रस्तीने ग्रासलेल्या कुटुंबातील हा विद्यार्थी. पण पालकांसाठी,आपल्या गावासाठी काही तरी करण्याची, शिकण्याची जिद्द घेऊन पुण्यात आलेल्या या विद्यार्थ्यांसाठी आधारस्तंभ, मायेची ऊब आणि त्याच्यातील आत्मविश्वासाची धग चेतवत ठेवणारे केंद्र म्हणजे विद्यार्थी सहायक समिती. आपले शिक्षण पूर्ण होईपर्यंत आपण राहणार कोठे, खाणार काय? या शिवाय अभ्यास कोठे करणार अशा नानाविध प्रश्नांची उकल होते, ती या केंद्रात. गरजवंत विद्यार्थ्यांसाठी, सावली देणारे झाड  होणारी ही संस्था.

शिक्षणाच्या निमित्ताने दुर्गम भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना मोकळा श्वास घेता यावा, त्यांच्यातील आत्मविश्वासाची मशाल तेवत ठेवता यावी, यासाठी झटणारी संस्था म्हणजे विद्यार्थी सहायक समिती. विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या पंखांना बळ देत असताना त्यांची राहण्या-खाण्याची सोय करणाऱ्या, अभ्यासासाठी सुसज्ज ग्रंथालय असणाऱ्या या संस्थेची चार वसतिगृह पुण्यात वसलेली आहेत. विद्यार्थ्यांना येथे राहण्यासाठी गरज असते ती त्यांच्या अंगी असणाऱ्या शिस्तप्रियतेसारख्या काही गुणांसह राहण्याची. निवड चाचणीद्वारे सुरुवातीला सहा महिन्यांसाठीचा प्रवेश आणि विद्यार्थ्यांची शिस्तप्रियता, अभ्यासातील प्रगती यावर आधारित सहा महिन्यांनी पुनर्प्रवेश अशी येथील प्रवेशप्रक्रिया. येथे पदवी अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत विद्यार्थी राहू शकतो, अर्थातच संस्थेच्या नियमांचे काटेकोर पालन आणि अभ्यासाच्या प्रगतिपथावरील वाटचालीनंतरच.

बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश देत असताना, विद्यार्थ्यांची गरज, अभ्यास करण्याची तळमळ अशा काही निकषांवर आधारित संस्थेत विद्यार्थी राहत असताना त्याचे व्यक्तिमत्त्व कसे बहरेल याकडेही समिती आवर्जून लक्ष पुरवते. कर्मचारी तसेच कार्यकर्त्यांबरोबर विद्यार्थ्यांचा वारंवार होणारा संवाद, त्याच्या वर्तणुकीपासून अभ्यासातील प्रगतीपर्यंत आणि समितीच्या नियमांमध्ये राहून विद्यार्थ्यांचे सर्वागीण शिक्षण येथे होते. इंग्रजी संभाषण, गटचर्चा, उद्योजकता कार्यशाळा, करियर विषयक मार्गदर्शन, समुपदेशन, विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींशी संवाद, शैक्षणिक सहली, ट्रेकिंग, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा अशा विविध उपक्रमांची येथे रेलचेल. याशिवाय ‘कमवा व शिका’ सारख्या योजनांमधून विद्यार्थ्यांना शैक्षणिक व वैयक्तिक खर्च भागविण्यासाठी मदत व्हावी हा उद्देश. या योजनेच्या उद्देशपूर्तीसाठी विद्यार्थ्यांना समितीत किंवा समितीच्या हितचिंतकांकडे कामे दिली जातात. त्यातून त्या विद्यार्थ्यांचा खर्च भागू शकतो. जून २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत समितीच्या विद्याथी-विद्यार्थिनींनी या योजनेअंतर्गत बावीस लाख रुपये रक्कम मिळवली. या योजनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो, श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व कळते, श्रमसंस्कृतीबरोबरच वैचारिक कौशल्यवृद्धी, व्यक्तिमत्त्व विकास होतो आणि मुख्य म्हणजे आर्थिक स्वावलंबन होते. विद्यार्थी सहायक समितीमध्ये प्रवेश मिळालेला प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनी या योजनेकरिता पात्र असते. किंबहुना ही योजना निवासी विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य आहे. या योजनेअंतर्गत हंगामी आणि नियमित स्वरूपाची कामे असतात, हंगामी कामात पत्रके वाटप, इव्हेंट मॅनेजमेंट तसेच नियमित कामात मदतनीस, डेटा इन्ट्री, रिसेप्शनिस्ट, वृद्धसेवा, बागकाम, कार्यालयीन कामे इत्यादी कामांचा समावेश होतो.

या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी वैद्यकीय चिकित्सा तसेच सल्लाही दिला जातो. योगासने, खेळसाधने, क्रीडांगण यांसारख्या गोष्टींबरोबरच अवांतर वाचनासाठी तसेच अभ्यासासाठी सुसज्ज ग्रंथालय, संगणक शिक्षण तसेच सराव आदी सुविधा देखील समितीमार्फत दिल्या जातात. तसेच हुशार तसेच अतिशय गरजू विद्यार्थ्यांला आर्थिक मदतही केली जाते. फक्त पाच विद्यार्थ्यांना भोजन साहाय्य करण्यापासून सुरू झालेल्या समितीच्या वसतिगृहांमध्ये सध्या सुमारे सातशेपन्नास निवासी व अनिवासी गरजू व गरीब विद्यार्थी-विद्यार्थिनी राहत आहेत.

मराठवाडय़ाबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील अतिदुर्गम भागांपासून पुण्याजवळील दुर्गम भाग जेथे बारावीनंतरच्या शिक्षणाच्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत, ज्या विद्यार्थ्यांचे पित्याचे छत्र हरपले आहे, त्यांच्या कुटुंबीयांचे उदरनिर्वाहाचे साधन नाही, अत्यंत हलाखीमध्ये हे विद्यार्थी राहत आहेत, पण त्यांना शिकण्याची जिद्द आहे, अशा विद्यार्थ्यांचा येथे प्रामुख्याने विचार केला जातो. समितीमध्ये राहायला आल्यानंतर बुजरी मुले-मुली आपले बुजरेपण जसे सोडतात, तसेच त्यांना त्यांच्यासारख्याच विविध आपत्तींना तोंड देणारी-समदु:खी, समविचारी मित्रमैत्रिणी मिळतात, तसेच त्यांची विकासाच्या दिशेने होणारी वाटचाल अधिक सुकर होऊ लागते. शिवाजी हौसिंग सोसायटीच्या मागे लजपतराय विद्यार्थी भवन आहे. तर फग्र्युसन रस्त्यावर शिवाजीनगर येथे डॉ. अच्युत शंकर आपटे हे विद्यार्थिनींचे वसतिगृह आहे. समितीच्या  कामांची माहिती करून घेण्यासाठी, त्यांच्या कामांत सहकार्य करण्यासाठी (०२०) २५५३३६३१ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

कमकुवत आर्थिक व भिन्न सामाजिक परिस्थिती असलेल्या होतकरू युवकांना अनेक समस्या आणि आव्हानांना तोंड द्यावे लागते, हीच गरज ओळखून डॉ. अच्युत शंकर आपटे यांनी विद्यार्थी सहायक समितीद्वारे विद्यार्थ्यांच्या निवास व भोजनाची अल्पदरात सोय करण्याची जबाबदारी खांद्यावर घेतली. आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी या सोयीचा लाभ घेतला असून त्यांनी आपले शिक्षण यशस्वी रीत्या पूर्ण केले आहे. अशा काही माजी विद्यार्थ्यांबरोबरच काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या सर्वाच्या सहकार्याने आज अनेकानेक मुलांना मायेची ऊब, गरजूंना घर, विद्वत्तेला दार आणि ज्ञानाचे भांडार खुले करून देण्यात येते. विद्यार्थी सहायक समितीचे वसतिगृह म्हणजे केवळ राहण्या-खाण्याची तसेच केवळ अभ्यासाची जागा नसून ते आहे युवा परिवर्तनाचे केंद्र.

Story img Loader