पुणे : पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुविधेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी वर्षातून एकदा पादचारी दिन आयोजित करून महापालिका केवळ वार्षिक आनंदोत्सव साजरा करत आहे. मात्र प्रत्यक्षात पादचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याने पादचारी दिन हा पादचाऱ्यांसाठी शोकदिन असल्याची टीका ‘पादचारी प्रथम’ संस्थेने केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पादचारी दिनानिमित्त पीएमपीच्या आज जादा गाड्या; दर तीस मिनिटांला गाडी, पीएमपीच्या संचलनात बदल

पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्ता सोमवारी (११ डिसेंबर) वाहनविरहित ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. सोमवारी सकाळी दहा ते सायंकाळी आठ या कालावधीत लक्ष्मी रस्ता वाहतुकीसाठी आणि पार्किंगसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पादचारी प्रथम या संस्थेचे अध्यक्ष प्रशांत इनामदार यांनी महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांना निवेदन दिले आहे. महापालिकेने पादचारी धोरण आणि शहरी मार्ग मार्गदर्शक धोरण यापूर्वीच स्वीकारले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी काय करणे अपेक्षित आहे, याची जाणीव महापालिकेला आहे. मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि रस्त्यांच्या योग्य रचनेसह या धोरणाची अंमलबजावणी केली असती तर आज परिस्थिती वेगळी दिसली असती. पादचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याची वस्तुस्थिती आहे. महापालिका केवळ रस्ते करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. रस्ता रुंदीकरणासाठी झाडे तोडली जात असून पदपथ अरूंद केले जात आहेत. पादचारी सिग्नलचा वेळ कमी करण्यात आला आहे. पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेची तडजोड करण्याचे धोरण महापालिकेने स्वीकारल्याचे दिसत आहे. त्यामुळे वर्षातून एकदा साजरा होणारा पादचारी दिन हा पादचाऱ्यांसाठी शोकदिन आहे, असे या निवेदनात इनामदार यांनी म्हटले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ngp s criticized pune municipal corporation for celebrating pedestrian day pune print news apk13 zws
Show comments