देशविघातक कृत्याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस आणि विविध राष्ट्रीय तपास संस्थांकडून कारवाई केली जात असून, एक मोठी कारवाई पुण्यात करण्यात आली आहे. ‘आयसिस’ महाराष्ट्र मॉड्युल प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गुरुवारी पुण्यातील कोंढवा परिसरात छापा टाकून एका डॉक्टरला अटक केली.
हेही वाचा >>> बारा वर्षाच्या मुलास कबुतराची विष्ठा खायला लावण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस; सराईत गुन्हेगारासह चौघांवर गुन्हा दाखल
कोंढवा परिसरात ‘एनआयए’ने छापा टाकून केलेल्या कारवाईत डॉ. अदनानली सरकार (वय ४३) याला अटक केली आहे. सरकार याच्या कोंढव्यातील घरावर छापा टाकून इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि ‘आयसिस’शी संबंधित अनेक दस्तावेज जप्त केले आहेत. हा आरोपी तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी भरती करत होता, अशी माहिती एनआयएच्या तपासात समोर आली आहे. आरोपीने इस्लामिक स्टेट, इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट, इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया सारख्या वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आयसिसच्या दहशतवादी कारवायांमध्ये मदत केल्याचे समोर आले आहे. आरोपी अदनानली हा देशाविरोधात दहशतवादी कृत्य करण्यासाठी विविध दहशतवादी संघटनांना मदत करत असल्याचे एनआयएच्या तपासात आढळून आले आहे.