पुणे: दहशतवादी विचारधारेचा प्रसार, तसेच तरुणांची माथी भडकावून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये ओढणाऱ्या आयसिसच्या महाराष्ट्र गटाकडून पुणे, मुंबईसह देशभरात कारवाया करण्याचा कट उधळला गेला. या प्रकरणी अटक केलेल्या सात दहशतवाद्यांविरुद्ध राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मुंबईतील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान उर्फ मटका उर्फ अमीर अब्दुल हमीद खान, मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी उर्फ आदिल उर्फ आदिल सलीम खान (दोघे रा. रतलाम, मध्यप्रदेश), कादीर दस्तगीर पठाण उर्फ अब्दुल कादीर (रा. कोंढवा), समीब नासीरउद्दीन काझी (रा. कोंढवा), जुल्फीकार अली बडोदावाला उर्फ लालाभाई उर्फ सईफ, शामिल साकीब नाचन, अकिफ आतिफ नाचन (तिघे रा. पडघा, जि. ठाणे ) अशी आराेपपत्र दाखल केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायदा (यूएपीए), स्फोटके तयार करणे, बाळगणे (एक्सप्लोझिव्ह सबस्टन्स ॲक्ट), तसेच विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा… लाॅरेन्स बिष्णोई टोळीतील शार्पशुटर संतोष जाधवच्या नावाने कोथरूडमधील व्यावसायिकाकडे खंडणी

पुण्यातील कोथरुड भागात दुचाकी चोरताना इम्रान खान, मोहम्मद साकी, मोहम्मद आमल यांना जुलैमध्ये अटक करण्यात आली होती. कोंढव्यात आरोपी साकी, खान, आमल वास्तव्यास होते. त्यांच्या घराची झडती घेतल्यावर त्यांचे बंदी घातलेल्या अल सुफा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे तपासात उघडकीस आले होते. राजस्थानात चितोड परिसरात त्यांच्याविरुद्ध स्फोटके बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून ते पसार झाले होते.

तसेच ते दहशतवादी संघटना आयसिसच्या संपर्कात असल्याचे तपासातून उघडकीस आले होते. महाराष्ट्र, गोवा, तेलंगणात आयसिसच्या विचारधारेचा प्रसार करण्याचे काम त्यांच्याकडे साेपविण्यात आले होते. दहशतवाद्याकडून पिस्तूल, स्फोटके सापडले होते. दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्यासाठी कोंढव्यात प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बाँम्बस्फोट घडविल्यानंतर अटक टाळण्यासाठी त्यांनी दुर्गम भागात लपण्याची जागा शोधली होती. पुण्यातील महत्वाच्या लष्करी संस्थांच्या परिसराचे त्यांनी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण केले होते, असे एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले होते.

दरम्यान, एनआयएने तीन दिवसांपूर्वी कोंढव्यातून पसार झालेला दहशतवादी मोहम्मद शहानवाज आलम उर्फ शफिकूर रहमान आलम याला अटक केली. त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले नाही. आलमला एनआयएच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nia has filed a charge sheet in a special court in mumbai against the seven terrorists arrested in terrorist activities case pune print news rbk 25 dvr