पुणे : पुण्यात अटक केलेल्या दहशतवाद्यांचे लागेबांधे ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेशी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आता या प्रकरणाचा तपास राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविला जाणार आहे. तपास ‘एनआयए’कडे सोपविण्याबाबतची न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘एनआयए’कडे तपास सोपविण्याबाबतची न्यायालयीन प्रक्रिया मंगळवापर्यंत (८ ऑगस्ट) पूर्ण होणार असल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकातील अधिकाऱ्यांनी दिली. कोथरूड परिसरात दुचाकी चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या महंमद युनूस महंमद याकूब साकी आणि महंमद इम्रान महंमद युसूफ खान यांना पोलिसांनी १८ जुलै २०२३ रोजी अटक केली होती. त्यांच्याकडून पांढऱ्या रंगाची पावडर, काडतूस, दहशतवादी संघटनांची पत्रके, तसेच ड्रोनचे साहित्य जप्त करण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपविण्यात आला होता. या दोघांनी पुणे, कोल्हापूर आणि सातारा येथील जंगलात बॉम्बस्फोट चाचणी केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर कोंढवा भागात याकूब साकी आणि इम्रान खान यांना राहण्यास खोली देणारा अब्दुल कादीर दस्तगीर पठाण आणि त्यांना आर्थिक रसद पुरविणारा खासगी कंपनीतील अभियंता सिमाब नसरुद्दीन काझी यांना अटक करण्यात आली होती.

दहशतवाद्यांनी पुण्यासह देशातील महत्त्वाच्या शहरात घातपाताचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले. ‘आयसिस’च्या दहशतवादी कारवायांसाठी तरुणांना जाळय़मत ओढण्यात महाराष्ट्रातील गट सक्रीय होता. याप्रकरणी एनआयएच्या पथकाने झुल्फीकार बडोदावाला याच्यासह पुण्यातील डॉ. अदनाल अली सरकार यांच्यासह चौघांना अटक केली होती.

कोथरुड भागात दुचाकी चोरताना अटक केलेल्या दहशतवाद्यांशी डॉ. सरकारचे संबंध असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाले होते.  ‘आयसिस’च्या दहशतवादी विचारधारेचा प्रसार करून तरुणांची माथी भडकावल्याप्रकरणी ‘एनआयए’ने मुंबई, ठाणे आणि पुण्यातून यापूर्वी ताबिश नासीर सिद्दीकी, जुबेर नूर महंमद शेख, अबू नुसैबा, शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांना अटक केली होती. दहशतवादी कारवायांमध्ये तरुणांना ओढण्यात हा गट सक्रिय होता.

या गटाचे पुण्यात अटक केलेल्या दहशतवाद्यांशी लागेबांधे असल्याचे उघडकीस आल्यानंतर एटीएसने पुण्यातील दाखल गुन्ह्यात बडोदावाला याला नुकतेच मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतले होते. बडोदावाला याने साकी आणि खान यांना पुण्यात आणून त्यांच्यामार्फत बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण शिबिर घेतले होते. बडोदावाला याच्या सांगण्यावरून अब्दुल पठाण याने साकी आणि खान यांना कोंढव्यात राहण्यासाठी खोली मिळवून दिली होती. साकी आणि खान हे दोघे मूळचे मध्य प्रदेशातील रतलाम येथील रहिवासी असून, दीड वर्षांपासून ते पुण्यात राहत होते.

महत्त्वाच्या शहरांत बॉम्बस्फोटाचा कट दहशतवाद्यांनी देशभरात घातपाती कारवायांचा कट रचला होता. ‘एटीएस’ने शनिवारी रात्री दहशतवाद्यांची दुचाकी, मोटार जप्त केली; तसेच पिस्तूल आणि पाच काडतुसेही जप्त करण्यात आली. दहशतवाद्यांकडून रासायनिक पावडर, द्रव्ये, प्रयोगशाळेतील उपकरणे, नकाशे आदी साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nia to investigate isis maharashtra module case zws