पिंपरी : घरमालकाला कॉफीमधून गुंगीचे औषध देऊन घरफोडी करणाऱ्या तीन नेपाळी नागरिकांना निगडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चार लाख पाच हजार रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. इतर दागिन्यांची नेपाळमध्ये विक्री करण्यात आली आहे. कमलबहादूर नरायण शाही (रा. बिरपथ, नेपाळ), नवीनबहादूर रुद्रबहादूर शाही (वय २४) आणि नरबहादूर दीप बहादूर शाही (वय ३८, रा. नेपाळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी प्राधिकरणात घरकाम करणाऱ्या नेपाळी महिलेने घरमालकाला कॉफीमधून गुंगीचे औषध दिले. घराबाहेर उभे राहिलेल्या साथीदारांना घरात बोलावून घेतले. घरातील रोकड, सोन्याचे दागिने असा १६ लाख २० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. गुन्ह्यात सहभागी असलेल्या कमलला हिंजवडीतून ताब्यात घेऊन अटक केली. इतर चार आरोपी मोबाइल बंद करून ऐवज घेऊन नेपाळला पळून गेल्याचे कमल याने सांगितले. गुन्हा करण्यापूर्वी आरोपी कर्नाटक राज्यातील बंगळुरू येथे वास्तव्यास होते. पोलिसांनी बंगळुरू येथे जाऊन माहिती घेतली असता, आरोपींनी तेथेही घरफोडी केल्याचे उघडकीस आले.
नातेवाइकांच्या समाजमाध्यमातील माहितीवरून आरोपींची माहिती घेण्यात आली. त्यांच्या नवीन खात्याची माहिती घेऊन पाच महिने लक्ष ठेवण्यात आले. नवीनबहादूर आणि नरबहादूर हे दोघे बंगळुरू येथे आल्याचे आणि विमानाने नेपाळ येथे परत जाण्याच्या तयारीत असताना स्थानिक पोलिसांच्या मदतीने दोघांना अटक करण्यात आली.
श्रीमंत कुटुंबांत घरकाम
‘नवीनबहादूर आणि नरबहादूर हे दोघे घरफोडी करणारे सराईत आहेत. ते साथीदारांसह भारतात येत होते. वेगवेगळ्या मोठ्या शहरांमध्ये जात होते. ते श्रीमंत कुटुंबांत कामासाठी राहून घरमालकाचा विश्वास संपादन करायचे. संधी साधून साथीदारांना बोलावून घ्यायचे. घरमालकाला जेवणातून, पेयातून गुंगीचे औषध देऊन ते चोरी करायचे. त्यानंतर तत्काळ नेपाळला जायचे. काही दिवसांनी भारतात येऊन वेगळ्या शहरात अशाच प्रकारे गुन्हे करायचे,’ असे पोलिसांनी सांगितले.