पुणे : प्रवाशांच्या मागणीनुसार पीएमपीने रातराणी सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. रातराणीच्या सेवेला गुरुवार (८ जून) पासून प्रारंभ होणार आहे. कात्रज ते शिवाजीनगर (नवीन बसस्थानक), कात्रज ते पुणे रेल्वे स्थानक, हडपसर ते स्वारगेट, हडपसर ते पुणे रेल्वे स्थानक, पुणे रेल्वे स्थानक ते एनडीए १० नंबर गेट या मार्गावर रातराणीची सेवा असेल.
कात्रज शिवाजीनगर सेवेचा मार्ग स्वारगेट, शनिपार, महापालिका भवन असा आहे. तर स्वारगेट, नाना पेठ, रास्ता पेठ मार्गे कात्रज ते पुणे रेल्वे स्थानक रातराणी धावणार आहे. हडपसर ते स्वारगेट गाडीचा मार्ग वैदूवाडी, रामटेकडी, पुलगेट असा असून हडपसर ते पुणे रेल्वे स्थानक गाडी पूलगेट, बाॅम्बे गॅरेज, वेस्ट एंड टाॅकिज मार्गे धावणार आहे.
हेही वाचा >>> पुणे : पालखी सोहळ्यासाठी पीएमपीकडून आजपासून विशेष बस सेवा
पुणे रेल्वे स्थानक ते एनडीए रातराणीचा मार्ग नाना पेठ, लक्ष्मी रस्ता, डेक्कन काॅर्नर असा आहे, अशी माहिती पीएमपीच्या वाहतूक विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, महापालिका भवन ते म्हाळुंगे गाव या मार्गाचा विस्तार पाडळे चौकापर्यंत करण्यात येणार आहे. हा मार्ग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बाणेर गांव, म्हाळुंगे गाव आणि पाडळे चौक असा असेल. रातराणी सेवेचा लाभ प्रवासी, नागरिक, विद्यार्थी, नोकरदार यांनी घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.