वृत्तवाहिन्यांशी स्पर्धा असली तरी मुद्रित माध्यमांनी आपले स्वत्व जपले असून ‘जागल्या’ची भूमिका कायम ठेवली आहे. माहितीचे विश्लेषण व समाजाला ज्ञान पोहोचवण्याचे काम वृत्तपत्रांनी प्रभावीपणे केले आहे. माध्यमे हा आरसा असून जसे प्रतििबब असेल तसेच चित्र दिसणार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सहा दशकांचा इतिहास सर्वानी मिळून पुढे न्यायचा आहे, असा सूर निगडीत एका परिसंवादात व्यक्त करण्यात आला.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या एकदिवसीय साहित्य संमेलनात ‘माध्यमांची वैचारिक दिशा-काल, आज आणि उद्या’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ‘लोकसत्ता’ चे निवासी संपादक मुकुंद संगोराम होते. ‘महाराष्ट्र टाईम्स’ चे निवासी संपादक पराग करंदीकर, ‘सकाळ’ चे वृत्तसंपादक माधव गोखले, ‘पुण्यनगरी’ च्या संपादिका राही भिडे यांनी या परिसंवादात सहभाग घेतला. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले उपस्थित होते.
संगोराम म्हणाले, महाराष्ट्रात असलेली वैचारिकतेची प्रदीर्घ परंपरा पश्चिम बंगाल वगळता देशातील अन्य राज्यात नाही. महाराष्ट्रात १३ व्या शतकात ज्ञानेश्वरांपासून सुरू झालेली बौध्दिक क्रांती माध्यमांमधून प्रतििबबित झाली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय माध्यमांमध्ये स्वातंत्र्य हाच हेतू होता. स्वातंत्र्यानंतरही माध्यमांनी माहिती देणे तसेच विचारांना प्रवृत्त करण्याचेच काम केले. आजही मुद्रित माध्यमे आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडत आहेत. वृत्तपत्रांची भूमिका ‘जागल्या’ ची आहे. लोकांना आवडणारा व जो त्यांनी वाचला पाहिजे, असा मजकूर वृत्तपत्रांमधून दिला जात होता. पूर्वी वृत्तवाहिन्यांचे टेन्शन नव्हते. आता स्पर्धा वाढली असली तरी माहितीचे विश्लेषण व समाजाला ज्ञान पोहोचवण्याचे काम मुद्रित माध्यमांनी प्रभावीपणे केले आहे. गेल्या २५ वर्षांत वृत्तपत्रे नवनव्या तंत्रज्ञानाला सामोरे जात असून विचारांची कास त्यांनी सोडलेली नाही. अनेक संकटे पचवूनही वृत्तपत्रे ताकदीने उभी राहिली आहेत.
करंदीकर म्हणाले, माध्यमे समाजाचा आरसा असून जसे प्रतििबब असेल तसेच चित्र दिसणार. दांभिक समाजाचे सर्व प्रतििबब त्यात दिसते. माध्यमांमध्ये १९९१ पर्यंत फारशी आवाहने नव्हती, नंतर परिस्थिती बदलली व नवमाध्यमांना सामोरे जावे लागले. वृत्तवाहिन्या आल्यानंतर स्पर्धा सुरू झाली, याकडे त्यांनी लक्ष वेधले. दोन वाहिन्यांच्या संपादकांनी टीकेची पुढची पायरी गाठल्याचा कांगावा करून त्यांच्याविरुध्द हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला. मात्र, ज्या आमदारांनी चार पायऱ्या ओलांडल्या, त्यांना जाब विचारायला नको का, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. गोखले म्हणाले, माध्यमांमधून सुरू झालेली वैचारिक क्रांती महाराष्ट्रात अखंडपणे सुरू आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सहा दशकांचा इतिहास सर्वानी मिळून पुढे न्यायचा आहे. अभिव्यक्त होण्याचे व्यासपीठ म्हणून माध्यमांकडे पाहिले जाते. अर्थकारण पाहता माध्यमांच्या दिशा ठरवण्यावर मर्यादा येतात. दिशा ठरवण्याची समाजाची एकत्रित जबाबदारी आहे. मोबाईल, टीव्ही, वृत्तपत्रांनी आपले आयुष्य व्यापून टाकले आहे, असे ते म्हणाले. भिडे म्हणाल्या, माध्यमांनी अनेक चळवळी चालवल्या कारण वैचारिक दिशा सुस्पष्ट होत्या. जागतिकीकरणामुळे वृत्तपत्रांवर संकट आल्याचे चित्र दिसत असले तरी सामाजिक बांधिलकीतून माध्यमांनी कामे केली पाहिजे. सध्याची पत्रकारिता पाहता अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आली आहे. माध्यमांना अमर्याद स्वातंत्र्य नको, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
‘वृत्तपत्रांची भूमिका ‘जागल्या’ ची’
वृत्तवाहिन्यांशी स्पर्धा असली तरी मुद्रित माध्यमांनी आपले स्वत्व जपले असून ‘जागल्या’ची भूमिका कायम ठेवली आहे. माहितीचे विश्लेषण व समाजाला ज्ञान पोहोचवण्याचे काम वृत्तपत्रांनी प्रभावीपणे केले आहे. माध्यमे हा आरसा असून जसे प्रतििबब असेल तसेच चित्र दिसणार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सहा दशकांचा इतिहास सर्वानी मिळून पुढे न्यायचा आहे, असा सूर निगडीत एका परिसंवादात व्यक्त करण्यात आला.
आणखी वाचा
First published on: 25-03-2013 at 02:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Night watchman is the role of newspapers