बालपणी झालेल्या पोलिओमुळे त्यांचे दोन्ही पाय अधू झाले. पुढे राज्यसेवा पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होऊनही अपंगत्वामुळे प्रशासकीय सेवेत जाण्यास पालकांचा विरोध झाला, पण संगणकाची आवड होती. त्यातून माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘ज्ञानकोश’ हे माहितीचे भांडार त्यांनी खुले केले. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी मोबाईल अॅप, ज्ञानवेद नॉलेज बँकही तयार केली. एवढय़ावरच न थांबता आपल्यासारख्या हजारो सहकाऱ्यांच्या मनातील मरगळ झटकून टाकण्यासाठी दिव्यांगांनी दिव्यांगांसाठी सुरू केलेले अपंग साहित्य संमेलन भरवण्यातही त्यांनी मंोलाचा वाटा उचलला.. ही ओळख आहे नीलेश छडवेलकर यांची.
छडवेलकर सोळा महिन्यांचे असताना अंगात ताप भरला म्हणून त्यांना डॉक्टरांकडे नेले तेव्हा निदान झाले की पोलिओ झाला आहे. तेव्हापासून दोन्ही पायांनी अधू असलेल्या नीलेश यांनी जिद्द मात्र सोडली नाही. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी राज्य सेवेची (एमपीएससी) पूर्वपरीक्षा दिली. परीक्षा उत्तीर्ण होऊनही केवळ दिव्यांग असल्याने घरातून विरोध झाला. मात्र, निराश न होता नीलेश यांनी वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी घेऊन संगणकाचा छोटा व्यवसाय सुरू केला. स्पर्धा परीक्षा देताना खूप पुस्तके वाचावी लागतात.
माहितीचा मोठा संचय लागतो, हे ओळखून त्यांनी उपयुक्त माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. ती एकत्र करून सर्वासाठी माहिती कशी उपलब्ध होईल, असा विचार करत त्यांनी ‘ज्ञानगंगा महाकोश’ हा प्रकल्प सुरू केला. त्यानंतर सीडीच्या माध्यमातून आणि त्याच्याही मर्यादा लक्षात घेऊन पुढे छडवेलकर यांनी संकेतस्थळाची निर्मिती आणि अॅन्ड्रॉइड अॅपही सुरू केले.
अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा यासाठीही त्यांनी काम केले आहे. नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नीलेश यांनी नुकतीच ज्ञानवेद नॉलेज बँक सुरू केली. या बँकेत विज्ञान, अर्थशास्त्रापासून धर्म, पुरस्कार, खेळ, संस्था आदी विषयांची भारतासह जगभरातील माहितीची २५ हजार पानांची माहिती आहे. याबरोबरच ही माहिती वाचताना काही शंका आल्यास ‘एनी टाईम लर्निग’ (एटीएल) ही सुविधाही त्यांनी सुरू केली आहे. याद्वारे काही शंका असल्यास त्याचे निरसनही या बँकेच्या प्रतिनिधींकडून केले जाते. तसेच विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवेद टॅलेंट हंट (डीटीएच) शिष्यवृत्तीही नीलेश यांनी सुरू केली असून दोन महिन्यांमध्येच ही बँक ७५ हजार घरांमध्ये पोहोचली आहे.
दिव्यांगांसाठी काही करायला हवे या उद्देशाने साहित्य संमेलन घ्यावे, अशी कल्पना पुढे आली. केवळ संमेलन न घेता त्यातून मदत आणि प्रेरणा मिळावी, ते स्वत:च्या पायावर उभे राहावेत, नकारात्मक भावना दूर व्हावी, या हेतूने दिव्यांगांनी दिव्यांगांसाठी वाहून घेतलेले जे एकमेव संमेलन सुरू झाले आहे त्याच्या आयोजनातही छडवेलकर यांचा पुढाकार असतो. हे आगामी संमेलन ११ आणि १२ फेब्रुवारी रोजी बेळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे.