पुणे : भाजपचे नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव या दोन्ही नेत्यांमध्ये मागील काही वर्षांत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळाले आहेत. पण आज नारायण राणे यांचे चिरंजीव माजी खासदार निलेश राणे यांची गुहागरच्या तळी येथे सायंकाळी जाहीर सभा होणार होती. या सभेला विरोध करण्यासाठी भास्कर जाधव यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. दरम्यान, दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या दगडफेकीत अनेक वाहनांच्या काचा आणि घरांच्या खिडक्या फुटल्या आहेत.
हेही वाचा – अजित पवार का म्हणाले, “…तर राजकारणातील माझी किंमत कमी होईल”
हेही वाचा – गडकरींच्या एका निर्णयाने राज्यसरकारच्या सहा हजार कोटींची बचत
या घटनेच्या दरम्यान भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौर्यावर होते. त्यावेळी गुहागर येथील घटनेबाबत विचारले असता ते म्हणाले की, असे भ्याड हल्ले करून कोणीच कुणाला थांबवू शकत नाहीत. जी घटना घडली आहे त्याबाबत योग्य कारवाई करू, अशी भूमिका मांडत ठाकरे गटाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली.